ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. गेल्या महिन्याभरापासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. सकाळी ७.३० वाजता हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. दिलीप कुमार यांना ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून ओळखले जाते. या ‘ट्रॅजेडी किंग’ची देखील एक लव्हस्टोरी आहे.
बॉलिवूड अभिनेत्री मधुबाला आणि दिलीप कुमार यांनी पहिल्यांदा १९५५ मध्ये ‘तराना’ या चित्रपटात एकत्र काम केले. या चित्रपटादरम्यान मधुबाला या दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडल्या. असे म्हणतात की, मधुबाला आणि दिलीप कुमार यांनी जेव्हा पहिल्यांदा एकमेकांना पाहिलं तेव्हाच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. इतकेच नाही तर मधुबाला यांनी त्यांच्या मेकअप आर्टिस्टकडे गुलाब आणि उर्दुमध्ये लिहीलेले पत्र दिलीप कुमार यांना पाठवले.
या पत्रात असे लिहिले होते की, ‘जर तुम्हाला मी आवडते तर हे गुलाब स्वीकारा, नाही तर परत करा.’ दिलीप कुमार यांनी हे गुलाब स्वीकारले आणि इथून या दोघांची लव्हस्टोरीला सुरुवात झाली.
त्यानंतर ऑनस्क्रीनसुद्धा या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. दरम्यान, एकदा दिलीप कुमार यांनी आपल्या बहिणीला लग्नाची मागणी घालण्यासाठी मधुबाला यांच्या घरी पाठवले आणि सांगितले की जर त्यांच्या कुटुंबातील लोक तयार असतील तर सात दिवसांत त्यांचे लग्न होईल. पण मधुबाला यांचे वडील अताउल्ला खान यांनी स्पष्टपणे नकार दिला होता.
मात्र, दिलीप कुमार यांची आत्मकथा ‘द सबस्टन्स अॅण्ड द शॅडो’ या पुस्तकात त्यांच नातं तुटण्याचं दुसरं कारण सांगितलं आहे. मधुबाला यांच्या वडिलांची स्वत: ची प्रॉडक्शन कंपनी होती आणि एका घरात दोन मोठे स्टार्स आसल्याचा त्यांना आनंद होता. मधुबाला यांच्या वडिलांची इच्छा होती की ते दोघेही आपल्या करियरच्या शेवटपर्यंत त्यांच्या चित्रपटात दिसले पाहिजेत. दिलीप कुमार यांची स्वतःची काम करण्याची आणि प्रोजेक्ट्स निवडण्याची पद्धत होती. दिलीप कुमार यांना हा प्रस्ताव आवडला नाही आणि मग हळूहळू त्याचा मधुबालाशी असलेल्या संबंधांवर परिणाम होऊ लागला.
तरी देखील दिलीप कुमार मधुबाला यांच्या प्रेमात होते. एका चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान दिलीप कुमार मधुबाला यांना म्हणाले की, त्यांना अजूनही मधुबाला यांच्याशी लग्न करायचे आहे. परंतु यासाठी अट अशी होती की मधुबाला यांना त्यांच्या वडिलांशी असलेल सगळे संबंध तोडावे लागतील. हे सगळं करणं मधुबाला यांच्यासाठी खूप कठीण होतं. मधुबाला यांचे उत्तर न मिळाल्यानंतर दिलीप कुमार मधुबाला यांच्या समोरून निघून गेले.
दिलीप कुमार आणि मधुबाला विभक्त झाले. विभक्त झाल्यानंतरही त्या दोघांना काही चित्रपटांमध्ये एकत्र काम करावे लागले. त्यापैकी एक चित्रपट म्हणजे ‘मुघल-ए-आझम’. चित्रपटाच्या काही सीनचे चित्रीकरण हे भोपाळमध्ये होणार होते पण मधुबाला यांचे वडील दिलीप कुमार आणि मधुबाला यांची तब्येत बिघडल्याने आउटडोर चित्रीकरणासाठी तयार नव्हते.