गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांचा ऐतिहासिक चित्रपटांकडे पाहण्याचा ओढा देखील वाढला आहे. त्यातच आता अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे नवा ऐतिहासिक चित्रपट घेऊन येत आहेत. ‘शिवप्रताप-गरुडझेप’ असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या अनेक नाटयमय घडामोडींपैकी ‘आग्र्याहून सुटका’हा महत्त्वपूर्ण कालखंड पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरची सगळीकडे चर्चा रंगली आहे.
हेही वाचा : ‘गन्स अँड गुलाब’चा टीझर प्रदर्शित, अभिनेता राजकुमार राव दिसणार वेगळ्या भूमिकेत
या ट्रेलरमध्ये औरंगाजेबाची हुकूमशाही, त्याचा क्रूरपणा, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असलेले त्यांचे मत, राग याची झलक पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे जिजाबाईंचा खंबीरपणा, छत्रपती शिवाजी महाराजांचा निडर स्वभाव, प्रजेबद्दल त्यांना वाटणारे प्रेम, सईबाई, सोयराबाई यांचे महाराजांशी असलेले नाते हे देखील पाहायला मिळत आहे. तीन मिनिटांचा असलेला हा ट्रेलर ऐतिहासिक घटनेवर अगदी बोलक्या स्वरुपाचा आहे.
या ट्रेलरच्या सुरुवातीला औरंगजेबाची क्रूर वृत्ती पाहायला मिळते. “अब हिंदू ही हिंदू को काटेगा…” या औरंगजेबच्या वाक्याने होते आणि अंगावर एकच काटा येतो. औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांना त्याच्या जन्मतिथीचे आमंत्रण देतो. छत्रपती शिवरायांना त्यांची जागा दाखवून देण्याचा हुकुम एका सरदाराला देतो आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाला भेटायला आल्यावर तेथे काय काय नाट्यमय घडामोडी घडतात, या सर्वांचा थरार आपल्याला या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. “औरंगजेब आमच्या हालचालींवर मर्यादा घालू शकतो, आमच्या बुद्धीवर नाही…” असे म्हणत छत्रपती शिवाजी महाराज आपली आग्र्याहून कशाप्रकारे सुटका करुन घेतात हे पाहणे औत्सुक्याची ठरणार आहे. या दमदार ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
आणखी वाचा : ‘वडापावच कोणेकाळी आधार होता…’ अभिनेते अमोल कोल्हेंनी जागवल्या स्ट्रगलच्या दिवसांच्या आठवणी
दरम्यान ‘जगदंब क्रिएशन’ प्रस्तुत आणि डॉ. अमोल कोल्हे निर्मित ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे. येत्या ५ ऑक्टोबरला ‘शिवप्रताप गरुडझेप’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अमोल कोल्हे हे छत्रपती शिवाजी महाराज, ज्येष्ठ अभिनेते यतीन कार्येकर हे मोगल बादशाह औरंगजेब आणि अभिनेत्री मनवा नाईक ही छत्रपती शिवाजी महाराज यांची पत्नी सोयराबाई मोहिते या भूमिकेत दिसणार आहे.