कौटुंबिक कथानकांसाठी प्रसिद्ध असलेला ‘राजश्री प्रॉडक्शन्स’ एका अनोख्या संकल्पनेसह नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. ‘हम चार’ असं या चित्रपटाचं नाव असून यामध्ये चार नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. ‘फ्रेंड्स भी फॅमिली है’ या टॅगलाइनसह ‘हम चार’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
नमित, सुरजो, अबीर आणि मंजरी अशा चार मित्रांची ही कहाणी आहे. ट्रेलरच्या सुरुवातीलाच ‘मेरी दोस्ती मेरा प्यार’ हे ‘दोस्ती’ चित्रपटातील गाणं पाहायला मिळत आहे. त्यानंतर एकमेकांपासून दुरावलेल्या या चार मित्रांमध्ये अजूनही एकमेकांविषयी असलेली काळजी, प्रेम ट्रेलरमध्ये अधोरेखित करण्यात आलं आहे.
वाचा : सेलिब्रिटींना भुरळ पाडणारे हे ’10 Year Challenge’ नेमकं आहे तरी काय?
प्रित कमानी, सिमरन शर्मा, अन्शुमन मल्होत्रा आणि तुषार पांडे हे चौघे मुख्य भूमिकेत आहेत. सलमान खानच्या ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटाच्या तीन वर्षांनंतर राजश्रीने ‘हम चार’ या चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक दीक्षित करणार आहे. तर सूरज बडजात्या क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत.
‘मैंने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’, ‘हम साथ साथ है’ असे सुपरहिट चित्रपट राजश्री प्रॉडक्शनने आजवर दिले आहेत. तीन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटाने केवळ तीन दिवसांत १०० कोटींचा गल्ला जमवला होता. राजश्रीच्या बहुतांश चित्रपटांमध्ये सलमान मुख्य भूमिकेत दिसतो. त्यामुळे आता ‘हम चार’मध्ये चार नवीन कलाकारांची वर्णी लागल्याने चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.