दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. कधी तिचे वैयक्तिक आयुष्य तर कधी तिचे चित्रपट हे चर्चेचा विषय ठरत असतात. दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या समांथाने बॉलिवूडमध्येही आपला ठसा उमटवला. तिच्या अभिनयाने देशभरात तिचे चाहते निर्माण झाले. त्यामुळे समांथाच्या आगामी चित्रपटांसाठी सर्वजण उत्सुक असतात. अशातच तिच्या ‘यशोदा’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्षित झाला आहे.
समांथा रुथ प्रभूचा ‘यशोदा’ हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक चित्रपट आहे. या चित्रपटाच्या घोषणेसूनच या चित्रपटाबद्दल प्रेक्षक खूप उत्सुक होते. आता अखेर या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
यशोदाचा हिंदी ट्रेलर वरुण धवनने, मूळतः तेलुगुमध्ये बनलेला ट्रेलर विजय देवरकोंडाने, तामिळ भाषेतील ट्रेलर सुर्याने, कन्नड ट्रेलर रक्षित शेट्टीने आणि मल्याळम भाषेचा ट्रेलर दुल्कर सलमानने लॉंच केला. या चित्रपटात समांथा अत्यंत वेगळ्या भूमिकेत आहे, हे या ट्रेलरमधून स्पष्ट होत आहे.
‘यशोदा’ चित्रपटाची कथा सरोगसीवर आधारित आहे. यामध्ये समंथा सरोगेट मदरच्या भूमिकेत आहे. ट्रेलरची सुरुवात यशोदा म्हणजेच समंथापासून होते. ती इतर मुलींबरोबर एका वायद्यकीय सुविधा पुरावणाऱ्या केंद्रात राहत असते. तिथे यशोदा आणि बाकीच्या मुलींना त्यांच्या मुलासाठी खूप पैसे मिळतील असे सांगितले जाते. पण यादरम्यान यशोदा म्हणजेच समंथासमोर अशा गोष्टी येतात ज्यामुळे तिला धक्का बसतो. यशोदा ज्या वैद्यकीय सुविधा देणाऱ्या केंद्रात राहत असते त्याच वैद्यकीय केंद्रावर तिला संशय येऊ लागतो आणि सरोगेट मुलींना ठेवण्याव्यतिरिक्त तिथे काही गैरप्रकार चालू आहेत हे तिला समजते. पुढे ती त्या गोष्टींचा शोध घेण्याच्या मागे लागते. आता यशोदा ते रहस्य उलगडू शकेल का? यात ती यशस्वी होईल का? हे सगळं या चित्रपटात पाहायला मिळेल. यशोदेचा हा प्रवास खूप अॅक्शन आणि थरार यांनी परिपूर्ण असणार आहे.
आणखी वाचा : नागाचैतन्यशी घटस्फोटानंतर समांथा पुन्हा अडकणार लग्नबंधनात? घेतला मोठा निर्णय
‘यशोदा’मध्ये समंथा रुथ प्रभू अॅक्शन करताना दिसणार आहे. तेलुगू आणि तामिळ भाषेत या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. तसेच ‘यशोदा’ हिंदी, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये डब करून रिलीज होईल. ‘यशोदा’ 11 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सामंथा व्यतिरिक्त उन्नी मुकुंदन, राव रमेश, मुरली शर्मा, मधुरिमा आणि वरलक्ष्मी सरथकुमार यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.