एक काळ होता, मरीठी चित्रपटाचे यश त्याच्या गुणवत्तेवरून मोजले जाई. १९३२ सालचा पहिला मराठी बोलपट ‘अयोध्येचा राजा’ (दिग्दर्शन आणि संकलन व्ही. शांताराम) या चित्रपटापासून यशाची कथा ही अशीच होती. दिग्दर्शक मा. विठ्ठल यांचा ‘औट घटकेचा राजा’ (१९३३) या चित्रपटापासून निशिकांत कामत याच्या ‘लय भारी’ (२०१४) या चित्रपटापर्यंत बऱ्याच मराठी चित्रपटानी रसिक प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळवला आणि त्या यशाचे विश्लेषण करताना त्या चित्रपटाच्या काळाचे समाजिक – सांस्कृतिक संदर्भाचे प्रतिबिंब जाणवते का?
फार पूर्वी चित्रपटाचे यश मोजताना दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांच्या ‘सावकारी पाश’ (१९३६) या ग्रामीण चित्रपटाचा सामाजिक आशय काय बर होता याला खूप महत्व होते. अगदी व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘कुंकू’ (१९३७) या सामाजिक चित्रपटापासून माधव शिंदे दिग्दर्शित ‘थोरातांची कमळा’पर्यंत (१९६३) हीच परिस्थिती कायम होती. अनंत माने दिग्दर्शित ‘केला इशारा जाता जाता’ (१९६५) या तमाशापटापासून यशस्वी चित्रपट एखादा नवा प्रवाह आणतो असे वळण आले, तमाशापटाची लाट आली. पण त्यानंतरचा काळ हा मराठी चित्रपटाच्या रौप्य अथवा सूवर्ण महोत्सवी आठवड्यांचा काळ होता. दादा कोंडके यांचा ‘सोंगाड्या’ व्ही. शांताराम यांचा ‘पिंजरा’ यापासून हे युग संचारले.
रवि जाधव दिग्दर्शित ‘बालक पालक’ आणि ‘टाईमपास’, संजय जाधव दिग्दर्शित ‘दुनियादारी’ येईपर्यंत किती दिवसात किती कोटी कमवले अशा गोष्टींना महत्व आले. समाजात एकूणच पैशाला प्रचंड महत्व आले, ज्याच्याकडे खूप पैसा तो खूप मोठा असे मानले जाते, त्याच सामाजिक बदलासह मराठी चित्रपटाचे यश मोजण्याची पध्दत बदलली असे म्हणायचे…
एवीतेवी गुणवत्ता ठरवायची तरी कशी? ‘यलो’चे सर्वांनी कौतुक करुनही त्याच्या यशाला मर्यादा पडल्या. त्यापेक्षा प्रचंड वातावरण निर्मिती करून पहिल्या चार दिवसात दहा कोटी कमाई झाली हे ‘लय भारी’ झाले म्हणायचे… चांगला चित्रपट त्याच्या गुणवत्तेने ओळखला जावा, ‘गल्ला पेटी’ वरील छनछनाटाची त्याला ओळख ती कशाला असे म्हणाल्याने तुम्ही कदाचित जुन्या काळातले गणले जाल, तेव्हा सांभाळा. सामाजिक परिस्थितीत ‘लय भारी’ फरक पडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा