‘शोर इन द सिटी’, ‘मांझी: द माऊंटन मॅन’, ‘बदलापूर’ असे आशयघन चित्रपट आणि ‘अहिल्या’सारख्या लघुपटामध्ये लक्षवेधी अभिनय करणारी अभिनेत्री राधिका आपटे हिला न्यूयॉर्कमधील ‘ट्रिबेका’ फिल्म फेस्टीव्हलमध्ये आंतरराष्ट्रीय वर्गवारीत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘मॅडली’ या लघुपटातील भूमिकेसाठी हा पुरस्कार तिला मिळाला.
अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, जपान, लंडन आणि भारत येथील सहा दिग्दर्शकांनी एकत्रितरित्या सहा वेगवेगळ्या प्रेमकथांवर लघूपटाची निर्मिती केली होती. भारतातून दिग्दर्शक अनुराग कश्यपचा या सहा दिग्दर्शकांमध्ये समावेश होता. ‘मॅडली’मध्ये राधिका आपटेने महत्त्वाची भूमिका साकारली होती. राधिकाच्या अभिनयाची जागतिक पातळीवर दखल घेतली गेली आणि तिच्या कामाची प्रशंसा देखील करण्यात आली. राधिकाच्या याच लघूपटातील एक व्हिडिओ क्लिप समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होऊन वाद निर्माण झाला होता. राधिकाला मिळालेल्या पुरस्काराबद्दल बॉलीवूडकरांनी तिला ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या. अभिनेता अर्जुन कपूर, विकी कौशल, हंसल मेहता यांनी राधिकाचे कौतुक केले.

Story img Loader