बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या ‘ट्युबलाइट’ चित्रपटातील गोंडस माटिन रे तंगूने थोड्याच कालावधीत लोकप्रियता प्राप्त केली. या लहानग्याचे अनेक चाहते निर्माण झाले आहेत. चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमाचा भाग असलेल्या वार्ताहर परिषदेतील माटिनची पहिलीच उपस्थिती चांगलीच चर्चेचा विषय ठरली. माटिनची तल्लख बुद्धी आणि अल्लडपणाला उपस्थितांनी चांगलीच दाद दिली. काल पार पडलेल्या ‘ट्युबलाइट’ चित्रपटाच्या प्रिमिअर शोतदेखील माटिनवरच सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इटानगरचा हा सुपरस्टार केवळ पाच वर्षांचा असून, आपल्या आजूबाजूला छायाचित्रकारांचा घोळका पाहून फारच उत्साही होतो. त्यामुळे त्यांना तो थेट सामोरा जातो. त्याचे मिचमिचे डोळे आनंदाने चमकू लागतात. आणि हा पठ्ठ्या जराही न अवघडता कॅमेऱ्याला नैसर्गिक पोज देतो.

‘ट्युबलाइट’ चित्रपटाच्या निमित्ताने स्टारडमच्या बाबतीत निरागस आणि लाघवी माटिनने सुपरस्टार सलमान खानला मात दिल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. चित्रपटातील अभिनय आणि आपल्या हुशारीच्या जोरावर त्याने अनेकांची मने जिंकली आहेत. चित्रपटात तो चीनमध्ये स्थायिक झालेल्या भारतीयाची भूमिका साकारत आहे. ज्याला भारत आणि चीनच्या युद्धाची झळ पोहोचली आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि गाण्यांच्या व्हिडिओमधून माटिनची अभिनय क्षमता अनेकांनी यापूर्वीच अनुभवली आहे.

दरम्यान, माटिनला चिनी नागरिक समजत पहिल्यांदा भारतात येऊन तुला कसं वाटतंय, असा विचित्र प्रश्न एका महिला पत्रकाराने विचारला होता, पण हजरजबाबी माटिनने ‘हम इंडिया पर ही बैठता है, तो इंडिया मे तो आयेगा ही कैसै? असे उत्तर देत उपस्थितांची वाह वाह मिळवली.

पहिल्याच भेटीत अपरिचिताशीही मैत्रीतील सहजता निर्माण करणारा माटिन बॉलिवूडचा लाडका बालकलाकार झाला आहे. १९६२ च्या इंडो-चायना युद्धाच्या पार्श्वभूमीवर बेतण्यात आलेला ‘ट्युबलाइट’ हा त्याचा पहिलाच चित्रपट आज प्रसिद्ध झाला असून, कबीर खानचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात ओम पुरी, सलमान खान, सोहेल खान आणि चिनी अभिनेत्री झु झु यांच्यादेखील प्रमुख भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tubelight child actor matin rey tangu