सलमान खानचा ‘ट्युबलाइट’ चित्रपट प्रदर्शित होण्यास अवघे ४ दिवस शिल्लक आहेत आणि विविध कार्यक्रमांमधून, सोशल मीडियावरून सलमान चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. प्रमोशनसाठी सोमवारी झालेल्या अशाच एका कार्यक्रमात ‘ट्युबलाइट’मधील बालकलाकार माटिन रे तंगूसुद्धा उपस्थित होता. अरूणाचल प्रदेशमधील इटानगर इथला अवघ्या आठ वर्षांचा माटिन याआधी चित्रपटाच्या ट्रेलरमध्येच झळकला होता. मात्र या कार्यक्रमात सलमान आणि माटिनच्या जोडीने सर्वांचीच मनं जिंकली. निरागसता आणि हजरजबाबीपणामुळे माटिन या कार्यक्रमात सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

या कार्यक्रमात माटिनने एका महिला पत्रकाराला दिलेल्या उत्तराने सर्वांचंच लक्ष वेधलंय. माटिनला चिनी नागरिक समजत महिला पत्रकाराने पहिल्यांदा भारतात येऊन तुला कसं वाटतंय, असा विचित्र प्रश्न विचारला. हा प्रश्न विचारताच तिच्या बाजूला बसलेल्या एका महिलेने माटिन चिनी नसून अरुणाचल प्रदेशचा असल्याचे तिला सांगितले. आपली चूक लक्षात येताच महिला पत्रकाराने तोच प्रश्न फिरवून माटिनला पहिल्यांदा मुंबईत येऊन कसं वाटतंय, असा दुसरा प्रश्न विचारला. तिचा प्रश्न नीट ऐकू न आल्याने माटिनने पुन्हा एकदा प्रश्न विचारण्यास सांगितले. त्यावेळी पहिला प्रश्न ऐकलेल्या सलमानने माटिनला सांगितले की, ‘तू पहिल्यांदा भारतात आला आहेस का असं ती विचारतेय.’ त्यावर हजरजबाबी माटिनने उत्तर दिलं की, ‘हम इंडिया पर ही बैठता है, तो इंडिया मे तो आयेगा ही कैसै? (मी भारतातीलच असल्याने भारतात कसा येणार?)’ माटिनच्या या उत्तरानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला.

वाचा : सलमानही डान्स गुरू बनू शकतो हे रेमोला का करायचंय सिद्ध?

दिसण्यामध्ये साम्य असल्याने अनेकदा त्यांना ईशान्य भारतातील लोकांना चिनी समजले जाते. ‘ट्युबलाइट’ चित्रपटाच्या निमित्ताने जेव्हा माटिन सर्वांसमोर आला, तेव्हा तो चिनी असल्याचेच अनेकांना वाटले. मात्र आपल्या या उत्तराने माटिनने हा गैरसमज दूर केला.

Story img Loader