प्रेम… जगणं व्यापून टाकणारी एक नितांत सुंदर भावना… नकळत कधीतरी, कुणीतरी आपल्या हृदयाच्या कोपऱ्यात घरं करू लागतं, त्याच्या किंवा तिच्या विचारांनी मनं घेरून जातं मग कुठे ध्यानात येतं की आपण प्रेमात पडलोय. मराठीतून इश्श म्हणून प्रेम करता येतं, उर्दूमध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं, व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं, कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं… शेवटी मंगेश पाडगावकरांनी म्हटलेच आहे, ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं.. तुमचं आणि आमचं सेम असतं’.  अशा या प्रेमात पुढे अनेक टिविस्ट येतात, कधी हे प्रेम व्यक्त केलं जात तर कधी अव्यक्तच राहतं. तेव्हा खूप उशीर होण्यापूर्वी प्रेम व्यक्त करा हे सांगणारा ‘तुझी माझी लवस्टोरी’ हा मराठी चित्रपट दिग्दर्शक ऋषिकेश मोरे घेऊन आले आहेत.
इंद्रनील आणि अदिती दोन वेगळ्या विचारधारांची व्यक्तिमत्व… इंद्रनीलच्या बहिणीची संध्याची मैत्रीण अदिती. योगायोगाने अदितीच्या सहवासात आलेला इंद्रनील तिच्या प्रेमात पडतो. त्यादरम्यान त्याला अनपेक्षित प्रसंगांना सामोरे जावे लागते. प्रेम व्यक्त करण्याच्या त्याच्या प्रयत्नांना अदिती काय आणि कसा प्रतिसाद देते, हे जाणून घेण्यासाठी पहा ‘तुझी माझी लवस्टोरी’. चित्रपटात इंद्रनीलच्या भूमिकेत गौरव घाटणेकर असून श्रुती मराठे यांनी अदितीची भूमिका साकारली आहे. ‘सिल्व्हर ऑटमन प्रॉडक्शन्स’ प्रस्तुत या चित्रपटाची कथा-पटकथा दिग्दर्शक ऋषिकेश मोरे यांनी लिहिली असून संवाद प्रशांत लोके यांनी लिहिलेत.
‘तुझी माझी लवस्टोरी’ मध्ये श्रुती मराठे, गौरव घाटणेकर यांच्यासोबत संकेत मोरे, कल्पना साठे, उदय लागू, नेहा बाम, मृणालिनी जांभळे, अशोक कुलकर्णी, श्रीकांत कामत, वरद चव्हाण, प्रशांत नेमन या कलाकारांच्या भूमिका आहेत. येत्या ४ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा