झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ या लोकप्रिय मालिकेत सध्या लगीनघाई पाहायला मिळत आहे. मालिकेत विक्रांत सरंजामे आणि इशा निमकर यांच्या संगीत आणि मेहंदी सोहळ्याची धूम असून त्याचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. येत्या १३ जानेवारीला मालिकेत हा विवाहसोहळा संपन्न होणार असून ११ तारखेला मेहंदी आणि १२ तारखेला साखरपुडा होणार आहे. लग्नाच्या एपिसोडचे शूटिंग नुकतेच पार पडले असून त्याचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
लग्नासाठी कुटुंबीयांकडून परवानगी मिळवण्यासाठी इशा आणि विक्रांतने बरेच अडथळे पार केले आहेत. अखेर १३ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास हे लग्न होणार आहे. या लग्नाची बोलणी झाली असून इशाला सरंजामे कुटुंबीयांनी सून म्हणून स्विकारलं असून तिला ‘टिळा’ लावण्याचा कार्यक्रम देखील पार पडला आहे. मराठमोळ्या लग्न विधींकरता विक्रांत सरंजामे यांनी महाराष्ट्रातील भोर या ठिकाणची निवड लग्नासाठी केली आहे.
अभिनेता सुबोध भावे यामध्ये विक्रांतची भूमिका साकारत असून गायत्री दातार इशाच्या भूमिकेत आहे. गायत्रीने या मालिकेतून पदार्पण केलं आहे. या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना फार आवडली आहे. अल्पावधीत या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. १३ जानेवारी रोजी या मालिकेचा विशेष एपिसोड प्रसारित होणार आहे. विक्रांत-इशाच्या लग्नाची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.