टीव्हीवर दररोज प्रदर्शित होणाऱ्या मालिका प्रेक्षकांच्या रोजच्या आयुष्याचा भाग बनतात. मालिकेतील कलाकार चाहत्यांना जवळचे वाटू लागतात. काही मालिकांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत जाते. त्यापैकीच एक असलेली सुप्रसिद्ध मालिका म्हणजे, “तुला शिकवीन चांगलाच धडा” ही आहे. झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारी ही मालिका प्रेक्षकांमध्ये आपली वेगळी जागा निर्माण करत मोठी प्रसिद्धी मिळवत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता या मालिकेचा नवीन प्रोमो प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर हा प्रोमो व्हायरल होत आहे.
“तुला शिकवीन चांगलाच धडा” या मालिकेच्या प्रोमोमध्ये अक्षरा आणि अधिपती समुद्राच्या काठी हृतिक रोशन आणि आमिषा पटेल यांचे लोकप्रिय गाणे “कहो ना प्यार है” या गाण्यावर शूट करताना दिसत आहेत. अक्षरा आणि अधिपती दोघांनीही पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. झी मराठी वाहिनीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. प्रोमो व्हिडीओ पोस्ट करताना “कोल्हापूरचा रंकाळा राहिला दूर, आता समुद्रावर संगटच जाळ अन् धूर..” असे दिलेले कॅप्शनदेखील लक्ष वेधून घेत आहे. यासोबतच, आता विषय हार्ड व्हनार असेदेखील लिहिलेले दिसत आहे.
सोशल मीडियावर हा प्रोमो व्हायरल होत असून या व्हिडीओखाली कंमेटचा पाऊस पडला आहे. नेटकरी मालिकेचा हा भाग पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसत आहे. एका नेटकऱ्याने, “हा व्हिडीओ किती वेळा पाहिला तरी मन भरत नाही”, असे म्हटले आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने, व्हिडीओ पाहिल्यानंतर सुरुवातीला हृतिक आणि आमिषा वाटल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा: तैमूरबरोबर असल्याने ईशा आणि आकाशच्या लग्नाला येऊ शकले नाही; नॅनींनी सांगितलं कारण
अक्षरा-अधिपती हनिमूनला जाणार असल्याचा सिक्वेल मालिकेत सुरू होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या भागांचे शूटिंग करण्यासाठी टीम परदेशात रवाना झाली आहे. याची झलक शर्मिष्ठा राऊतने व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केली होती. याबरोबरच कलाकारांनी फुकेतमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळेने अक्षरा ही भूमिका साकारली आहे, तर अधिपतीच्या भूमिकेत अभिनेता ऋषिकेश शेलार दिसत आहे. शर्मिष्ठा राऊत दिग्दर्शित या मालिकेने गेल्या दीड वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आपला चाहतावर्ग निर्माण केला आहे. आता मालिका कोणत्या वळणावर जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याबरोबरच भुवनेश्वरी अक्षराला घरातून बाहेर काढण्यात यशस्वी होणार का? हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.
© IE Online Media Services (P) Ltd