अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सुरु झालेला बॉलिवूडमधल्या घराणेशाहीचा वाद अजूनही शमला नाही. अनेक मोठमोठे कलाकार आता या मुद्द्यावर मनमोकळेपणाने बोलू लागले आहेत. ‘तुम्बाड’, ‘सिम्बा’, ‘आर्टिकल १५’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणारी अभिनेत्री रोंजिनी चक्रवर्ती हिलासुद्धा घराणेशाहीचा सामना करावा लागला होता. स्टारकिडला चित्रपटात घेण्यासाठी तिला काढून टाकण्यात आलं होतं, असा खुलासा रोंजिनीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला.

‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत रोंजिनी म्हणाली, “हे अनेकदा घडतं. एका स्टारकिडला चित्रपटात घेण्यासाठी मला काढून टाकण्यात आलं होतं. त्यांना ओळखीचा चेहरा हवा होता. मला असं वाटतं की हे प्रत्येक क्षेत्रात होतं आणि इंडस्ट्रीत सर्वाधिक घडताना दिसतं. अधिकाधिक मेहनत करून पुढे जाणे हाच एकमेव पर्याय असतो. मी प्रेक्षकांना अधिक महत्त्व देते. माझ्या अभिनयाने त्यांच्याशी जोडून राहण्याचा प्रयत्न करते. प्रेक्षकांनी त्यांचे ५०० रुपये माझं अभिनय पाहण्यासाठी खर्च करावं, यासाठी मला तेवढ्या ताकदीची अभिनेत्री व्हावं लागेल.”

रोंजिनीने २०१२ मध्ये ‘सिडनी विथ लव्ह’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुंबाड’ या चित्रपटामुळे तिला खरी ओळख मिळाली. तिने ‘सिम्बा’ आणि ‘आर्टिकल १५’ या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. त्याचसोबत ‘रक्तांचल’ आणि ‘लाल बाजार’ या वेब सीरिजमधल्या तिच्या अभिनयानेही प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. रोंजिनी लवकरच ‘रक्तांचल’च्या दुसऱ्या सिझनमध्ये झळकणार आहे.