‘कांतारा’ हा कन्नड चित्रपट यंदाच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा’ जगभरात तब्बल ४०० कोटींहून अधिक कमाई करत चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी झाला. त्यानंतर नेटकऱ्यांनी या चित्रपटाची तुलना आनंद गांधींच्या ‘तुंबाड’शी केली होती. या तुलनेनंतर ‘तुंबाड’चे दिग्दर्शक आनंद गांधी यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे ते चर्चेत आहेत.
हेही वाचा – पहिल्यांदाच पालकांच्या घटस्फोटाबद्दल बोलला इशान खट्टर; म्हणाला, “भाऊ शाहिद कपूरने…”
‘कांतारा’ची तुलना ‘तुंबाड’शी झाल्यानंतर आनंद गांधींनी एक ट्वीट केलं होतं. ‘तुंबाड’ हा चित्रपट कांतारासारखा विचारांमध्ये विषारीपणा आलेल्या पुरुषत्वाचा उदोउदो करत नसल्याचं म्हटलं होतं. “‘कांतारा’मध्ये ‘तुंबाड’सारखं काहीच नाही. ‘तुंबाड’ या भयपटात विचारांमध्ये विषारीपणा आलेलं पुरुषत्व आणि संकुचितपणा यांचं रूपक मांडणं ही माझी कल्पना होती. पण ‘कांतारा’मध्ये त्याचाच उत्सव केला गेलाय,” असं गांधींनी ट्वीटमध्य म्हटलं होतं.
अलीकडेच ‘इंडिया टुडे’शी बोलताना आनंद गांधी यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. तसेच ‘तुंबाड’चा दुसरा भाग बनवण्याचा आपला कोणताही विचार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ‘जर तुम्ही कांतारा चित्रपटाचा अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टीला भेटलात तर तुम्ही त्याला काय सांगाल?’ असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर गांधी म्हणाले, “कन्नड सिनेमाला जागतिक स्तरावर आणण्याच्या त्यांच्या प्रशंसनीय कार्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करेन. या व्यतिरिक्त चित्रपटाचे पात्र लिहिताना आणि त्या पात्रांबद्दलचा जागतिक दृष्टिकोन करण्याच्या प्रक्रियेबद्दल ऐकायला मला आवडेल.”
हेही वाचा – “आपल्या समाजात…”, चित्रपटांमुळे हिंसेला प्रोत्साहन मिळत असल्याच्या आरोपांवर नीना गुप्तांनी मांडलं मत
‘तुम्ही कांताराचं दिग्दर्शन केलं असतं, तर त्यात वेगळेपण काय असतं?’ असं विचारल्यावर गांधी म्हणाले, “मला नाही वाटत की मी ‘कांतारा’सारखा चित्रपट बनवू शकलो असतो. कारण तो चित्रपट म्हणजे भूतकाळाचे प्रतिबिंब, वर्तमानकाळाचा आरसा आणि भविष्याचे दर्शन आहे. त्यादृष्टीने त्याची मांडणी करण्यात आली आहे. खरं तर मला भारताच्या प्रगल्भतेचा गौरव करणारे आणखी चित्रपट पाहायला आवडतील. आपल्या संस्कृतीत साजरं करण्यासारखं खूप काही आहे,” असं ते म्हणाले.