जातीचे राजकारण, आरक्षणाचे धोरण, त्याचे फायदे-तोटे, आरक्षण असावे की नसावे, जातव्यवस्था या विषयावर अनेक कलाकृती आल्या आहेत. आता जातव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन माणूसपणाचा शोध घेणारे सामाजिक-राजकीय आशयाचे ‘तुम्ही आम्ही’ हे नवीन नाटक शुक्रवारपासून रंगभूमीवर येत आहे.
 या नाटकाचे वैशिष्टय़ म्हणजे अभिनेता संदीप कुलकर्णी तब्बल १५ वर्षांनंतर व्यावसायिक रंगभूमीवर पुनरागमन करतोय. लेखिका-दिग्दर्शिका मनस्विनी लता रवींद्र हीसुद्धा प्रमुख भूमिकेत दिसणार  आहे.
वामन तावडे लिखित आणि अनिल गवस दिग्दर्शित या नाटकाविषयी बोलताना संदीप कुलकर्णी म्हणाला की, लहानपणापासून आपल्या समाजातील सर्वाचेच पालनपोषण एका विशिष्ट विचारसरणीतून होत असते. प्रत्येक व्यक्तीचे सामथ्र्य, गुणवत्ता याकडे दुर्लक्ष करून जात व्यवस्थेमुळे आपल्या देशाची प्रगती खुंटलीय असेही म्हणता येईल. त्यामुळे या सगळ्यावर सामाजिक-राजकीय भाष्य करणारे हे महत्त्वाचे नाटक आहे. यापूर्वी प्रायोगिक रंगभूमीवर काम केले असले तरी व्यावसायिक रंगभूमीवर विविध प्रकारच्या भूूमिका साकारण्याची इच्छाही खूप होती. तीन वर्षांपूर्वीच आपल्याला विचारणा झाली होती. एवढेच नव्हे तर सिद्धार्थ जाधव ही यातली प्रमुख व्यक्तिरेखा मीच करावी असाही आग्रह होत होता, असे संदीपने सांगितले.
नाटकांतून छोटय़ा छोटय़ा भूमिका केल्या आहेत. परंतु, मुख्यत्वे लेखन-दिग्दर्शन जास्ती केले आहे. वसुंधरा ही सिद्धार्थ जाधवच्या बायकोची भूमिका करताना खूप मजा येतेय. दिग्दर्शन करताना ‘एवढं साधं जमत नाही’ असं म्हणायचे. परंतु, प्रत्यक्षात ही भूमिका साकारताना त्याचा अर्थ कळला. लेखन-दिग्दर्शन करताना अनेक गोष्टी पाहाव्या लागतात. परंतु, इथे फक्त भूमिका साकारायची असल्यामुळे स्वत:वर खूप लक्ष द्यावे लागले. थोडे आत्मकेंद्री व्हावे लागले, असे मनस्विनीने सांगितले.