टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने २४ डिसेंबर रोजी मालिकेच्या सेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली. २७ डिसेंबर रोजी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, तुनिषाच्या आत्महत्येनंतर बॉयफ्रेंड आणि सहकलाकार शिझान खानला अटक करण्यात आली असून त्याला रविवारी कोर्टासमोर हजर करण्यात आले होते. त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, एकीकडे या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू असताना दुसरीकडे तुनिषा शर्माचे काका पवन शर्मा यांनी मोठा दावा केला आहे. हे १०० टक्के लव्ह जिहादचे प्रकरण आहे, असे पवन शर्मा म्हणाले आहेत.
हेही वाचा >>> आत्महत्येच्या तीन दिवसांनंतर तुनिषा शर्मावर अंत्यसंस्कार; लेकीला निरोप देताना आईला अश्रू अनावर
“मला वाटते हे १०० टक्के लव्ह जिहादचे प्रकरण आहे. पोलिसांनी याबाबत तपास करावा, अशी माझी मागणी आहे. तुनिषाच्या मृत्यूचा प्रत्येक दृष्टीकोनातून तपास व्हायला हवा, अशी आमची मागणी आहे. तुनिषाने आत्महत्या केली की तिचा मृत्यू अन्य कशामुळे झाला, याबाबत आम्हाला काहीही माहिती नाही,” असे पवन शर्मा म्हणाले.
हेही वाचा >>> तुनिषा शर्माच्या अंत्यविधीदरम्यान शिझान खानच्या बहिणींना अश्रू अनावर; अभिनेत्रीला निरोप देताना हमसून हमसून रडल्या दोघी
त्यांनी पोलिसांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “कोणताही सखोल तपास न करता पोलीस तुनिषाचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला, असे कसे म्हणू शकतात. पोलिसांनी अगोदर या प्रकरणाचा सखोल तपास करायला हवा. त्यानंतर तुनिषाचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला की लव्ह जिहाद तिच्या मृत्यूचे कारण होते हे समजेल,” असे पवन शर्मा म्हणाले. पोलिसांनी तुनिषाच्या कुटुंबियांचा अद्याप जबाब घेतला नसल्याचाही आरोप पवन शर्मा यांनी केला.
दरम्यान, पवन शर्मा यांनी तुनिषाचा मृत्यूचा संबंध लव्ह जिहादशी लावल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. याआधी भाजपाचे नेते राम कदम यांनी इंडिया टुडेशी बोलत असताना या प्रकरणाची पोलीस कसून चौकशी करतील असे मत व्यक्त केले होते. तसेच चौकशीत लव्ह जिहादचा अँगल समोर आला तर त्यादृष्टीने देखील सखोल चौकशी होईल, असे सांगितले होते. ‘लव्ह जिहादच्या मागे कोणती संघटना आहे का? त्यांचे काय षडयंत्र आहे? याचाही तपास पोलीस करतील आणि तुनिषाच्या कुटुंबाला न्याय मिळवून देतील,’ असे राम कदम यांनी सांगितले होते.