अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी तिचा बॉयफ्रेंड आणि मालिकेतील सह-कलाकार शिझान खान पोलीस कोठडीत आहे. शिझानने मुलीची फसवणूक केल्याचा आरोप तुनिषाच्या आईने केला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. सध्या शिझानची पोलीस चौकशी सुरू आहे. अशातच तुनिषाची मैत्रीण मॉडेल राया लबीबने धक्कादायक दावा केला आहे.
राया लबीबने आधी दावा केला होता की तुनिषा गर्भवती असण्याची शक्यता होती, पण तिने गर्भपातासाठी गोळ्या घेतल्या असतील. त्यातच आता तिने इंडिया टुडेशी बोलताना शिझानवर गंभीर आरोप केले आहेत. शिझान तुनिषाला मारहाण करायचा आणि रागाच्या भरात वस्तू फोडायचा, असं तिने म्हटलंय. तसेच त्याने त्याच्या सिक्रेट गर्लफ्रेंडसोबतच्या चॅट्स डिलीट केल्या होत्या. तुनिषाने शिझानला त्याच्या रिलेशनशिपबद्दल विचारलं होतं, असा दावाही रायाने केला आहे.
दरम्यान, राया लबीबने तुनिषाच्या मृत्यूनंतर ती गर्भवती असल्याचा दावा केला होता. “तुनिषा शर्मा गरोदर होती, अशी शक्यता आहे. कदाचित ती तिच्या मृत्यूच्या वेळी गरोदर नसावी, पण ती याआधी गरोदर राहिली असेल आणि गोळ्या खाऊन तिचा गर्भपात झाला असावा. मला नक्की माहीत नाही, पण तिला कशाची तरी खूप काळजी वाटत होती,” असा दावा रायाने केला होता. त्यातच आता तिने शिझानवर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांची दखल घेऊन पोलीस कोणती कारवाई करतील, ते येत्या काळातच कळेल.