रसिका शिंदे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनाकाळानंतर एकीकडे सर्व क्षेत्रांना पुन्हा उभारी मिळाली असली तरी कुठे तरी प्रत्येकजण तणावाखाली जगतो आहे असे भासते. आर्थिक अस्थिरता, प्रेमातील नकार, नातेसंबंधांमधील दुरावा अशा अनेक गोष्टींमुळे ताणतणाव वाढू लागले आहेत. परिणामी मागचा पुढचा विचार न करता आत्महत्या करून आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला जातो. मनोरंजन क्षेत्रही या अनुभवापासून दूर राहिलेले नाही. किंबहुना, नैराश्यामुळे किंवा तणावामुळे कलाकारांनी आत्महत्या केल्याच्या घटनांमध्ये गेल्या काही वषार्ंत वाढ झालेली पाहायला मिळते आहे. ‘अलिबाबा : दास्तान ए काबूल’ या मालिकेतील मुख्य अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने मालिकेच्या सेटवरच आत्महत्या केल्यामुळे पुन्हा एकदा कलाकारांना येणारा मानसिक ताण, नैराश्य याबद्दलच्या चर्चेने जोर धरला आहे.

प्रेक्षकांचं दुर्लक्ष हे तणावाचं मोठं कारण
कलाकार मंडळी म्हटलं की सातत्याने चर्चेत राहणं हे ओघाने आलंच. एखाद्या कलाकाराला चर्चेत ठेवणं किंवा न ठेवणं हे पूर्णत: प्रेक्षकांच्या हातात असतं. प्रसिद्धीच्या झोतात असलेला एखाद्या कलाकाराला अचानक प्रेक्षकांकडून नापसंती मिळायला लागली तर हा ताण सहन करणं त्यांना कठीण जातं. यावर बोलताना अभिनेता कश्यप परुळेकर म्हणतो, ‘प्रेक्षकांच्या पसंतीवर कलाकारांचं आयुष्य खऱ्या अर्थाने अवलंबून असतं. कलाकाराची भूमिका, अभिनय त्यांना आवडला नाही तर तो त्यांच्या मनातून उतरतो. आणि पर्यायाने कलाकारांना मानसिक ताण येतो. अशा वेळी प्रेक्षकांच्या आवडी-निवडी जपत त्यांना कोणता आशय रुचतो याचा थोडा अंदाज घ्यायला हवा. विषयाची चोख निवड आणि उत्तम अभिनय या दोहोंची सांगड घालता यायला हवी’. एकीकडे काम मिळण्याबाबतची अनिश्चितता हेही नैराश्य येण्यामागचं मोठं कारण आहे, असा मुद्दा अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी मांडला. ‘‘एकाच वेळी मी जर मालिका, चित्रपट, नाटक अशा अनेकानेक गोष्टी करत असेन तर माझा तणाव निघून जातो. कारण हातात काम असल्यामुळे आर्थिक अडचणींचा प्रश्नच उद्भवत नाही. उलट काही कामच नसेल तर मात्र मला किंवा इतर कलाकारांना ताण येणं स्वाभाविक आहे. त्यामुळे एकावेळेस विविध माध्यमांत अनेक भूमिका साकारत असताना नियोजन करणं फार महत्त्वाचं आहे, असा सल्लाही ओक यांनी दिला.

मानसोपचारतज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्यायलाच हवं..
प्रत्येक कलाकाराच्या वैयक्तिक, वैवाहिक अथवा कौटुंबिक जीवनातही अनेक चढ-उतार येत असतात. अशावेळी वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याचा समतोल राखणं ही प्रत्येक कलाकारासाठी तारेवरची कसरत असते. कार्यालयात काम करणाऱ्या एखाद्या कर्मचाऱ्याला जशी आपल्या वैयक्तिक कारणांमुळे नोकरी जाण्याची भीती असते तशीच किंबहुना त्याहून जास्त भीती कलाकारांना त्यांच्या हातातील भूमिका काढून घेतली जाण्याची, सेटवरून थेट घरी रवानगी केली जाण्याची भीती देखील असतेच. याबद्दल बोलताना अभिनेत्री अनिता दाते म्हणते, ‘‘आयुष्यातील अडचणींचा सामना करणं ज्यावेळी कलाकारांना असह्य होतं त्यावेळी ते सहकलाकार किंवा मित्र-मैत्रिणींसोबत चर्चा करून तणाव कमी करण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतात. पण बऱ्याचदा केवळ चर्चानी हा प्रश्न सुटला नाही तर मानसिक तज्ज्ञांचा सल्ला घेत मानसिक स्वास्थ्य सृदृढ ठेवण्यासाठी कलाकारांनी प्रयत्न करायलाच हवेत. मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेणं म्हणजे आपल्या डोक्यावर परिणाम झाला आहे, हा गैरसमज उराशी बाळगण्यापेक्षा त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन, व्यायाम आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न केल्यास गोष्टी सुखकर होतील.’’

प्रवासाचा ताण
मालिका, चित्रपट आणि नाटक अशा तिन्ही माध्यमांत एकाच वेळी कार्यरत असलेल्या कलाकारांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणं हे शारीरिक, मानसिक आणि आर्थिकदृष्टय़ा फार खर्चीक आणि थकवणारं असतं, असं अनिता म्हणते. तर अनेक वेळा लागोपाठ चित्रीकरणामुळे कलाकारांची झोप होत नाही, अशा वेळी प्रवासात तरी झोप व्हावी ही आशा जरी असली तरी अनेक वेळा ती पूर्ण होत नाही, अशी खंत नंदिताने व्यक्त केली. त्यामुळे मनाजोगी भूमिका साकारायला जरी मिळाली तरी मुंबई किंवा मुंबई बाहेर सतत प्रवास काही कलाकारांना चुकवता येत नाही.

मराठी कलाकार कधीच एकटे नसतात
त्रासाला कंटाळून आपले जीवन संपवण्याचे कठोर पाऊल गेल्या काही काळात अनेक हिंदी कलाकारांनी उचललेले पाहायला मिळाले. मात्र, मराठी मनोरंजनसृष्टीत सुदैवाने अशा घटना फारशा होत नाहीत. त्यामागचं कारण सांगताना कश्यप म्हणतो, ‘‘मराठी कलाकार कधी एकटे राहात नाहीत. त्यांचा त्यांचा एक चमू असतो. सेटवरही सहसा कधीच आपल्या सहकलाकाराला एकटं सोडण्याचा प्रकार मराठीत होत नाही. व्यावसायिक जीवनातील कोणत्याही अडचणी असल्यास त्या या समूहातील व्यक्तींशी चर्चा केल्यामुळे त्यातून काही ना काहीतरी मार्ग मिळतो.’’

समाजमाध्यमांचा काटेकोर वापर
६०-७० च्या दशकात केवळ नाटकांत काम करणं किंवा नुकत्याच आलेल्या दूरदर्शनवरील मालिकांमध्ये अथवा चित्रपटांमध्ये काम करणं इथवर मराठी कलाकार सीमित होते. आता मात्र बहुभाषिक आणि बहुपर्यायी माध्यमं कलाकारांना उपलब्ध आहेत. ‘‘ज्यावेळी मी काम करत होतो त्यावेळी आर्थिक अडचणींमुळे हातात जे काम येत होतं मग तो चित्रपट असो, नाटक किंवा मालिका जे पडेल ते काम करणं ही काळाची गरज होती. मात्र आता ओटीटीसारख्या माध्यमांमुळे कलाकारांनाही त्यांच्या आवडीची भूमिका चित्रपटात साकारता आली नाही तर त्याचा ताण न घेता इतर माध्यमांवर आपली कला सादर करण्याची संधी मिळते’’, असं प्रसाद म्हणतो. त्यामुळे आर्थिक ताण काही प्रमाणात कमी झाला असला तरी सध्या समाजमाध्यमे आणि डिजिटल वाहिन्यांमुळे चोवीस तास कलाकारांच्या वैयक्तिक-व्यावसायिक आयुष्यावर प्रेक्षकांची करडी नजर असते. त्याचा मात्र कलाकारांना मनस्ताप होतो, असं तो म्हणतो. आपल्या जीवनात समाजमाध्यमाचा उपयोग हा आपल्या फायद्यासाठी कसा करून घेता येईल याची खबरदारी कलाकारांनी घ्यायला हवी असं नंदिता पाटकर सांगते. शेवटी कलाकारही माणूसच असल्याने त्याच्यावरही इतरांसारखाच विविध घटकांचा चांगला-वाईट परिणाम होत असतो. मात्र थोडी सावधगिरी बाळगत सगळय़ांबरोबर एकत्र राहून, चर्चा करून आपलं चोख काम केलं तर संवादाविना आयुष्य संपवण्याचा आततायी निर्णय घ्यावा लागणार नाही, असंच या कलाकारांचं म्हणणं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tunisha sharma suicide case alibaba tunisha sharma is the lead actress in the serial dastan e kabul amy
Show comments