टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली. २४ डिसेंबर रोजी दुपारी वसई येथील सेटवर तुनिषा शर्माने आत्महत्या केल्यानंतर तिचा कथित प्रियकर शिझान खानला पोलिसांनी अटक केली. शिझाननेच तुनिषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप तिच्या आईने केला होता. त्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन तुनिषाच्या कुटुंबियांनी आणखी गंभीर आरोप केले आहेत.
तुनिषाची आई वनिता शर्मा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “शिझानच्या परिवाराने तुनिषाचा वापर केला. तिच्या कुटुंबियांनी तिला फसवले. तुनिषाने नेहमी सांगायची की माझ्यासोबत दगा झालाय, मला फसवलं गेलं. यानंतर मी शिझानला जाब विचारला होता. काही दिवसांपासून तुनिषाच्या वागण्यात बदल झालेला मला दिसला. त्याच्या आईला तुनिषा अम्मा म्हणत होती. मुस्लिम धर्माप्रमाणे आचरण करायला लागली होती.”
हे ही वाचा >> “तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणात लव्ह जिहादचा अँगल असेल तर…” भाजपा आमदार राम कदम आक्रमक
आम्हाला कळले की, शिझाननेच मेकअप रुममधून तुनिषाला खाली उतरवले. त्यामुळे हा खून देखील असू शकतो. तिला खाली उतरवल्यानंतर १५ मिनिटांपर्यंत तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी एकही गाडी आली नाही. रुग्णवाहिका लवकर बोलवली गेली नाही. त्यामुळे तुनिषाची हत्या झाली आहे का? या दिशेनेही तपास व्हावा, अशी मागणी तुनिषा शर्माच्या आईने केली.
वनिता शर्मा यांनी सांगितले की, “शिझान ड्रग्जचे सेवन करत होता. ज्यामुळे तुनिषा आणि त्याच्यामध्ये वाद होत होते. तुनिषाला त्याचे ड्रग्ज घेणे मंजूर नव्हते. तसेच शिझान तिच्यावर मुस्लिम धर्माचे आचरण करण्यासाठी दबाव टाकत होता. शिझानच्या फोनमधून तुनिषाला कळलं होतं की, तो तिला फसवतोय. याचा जाब विचारल्यानंतर शिझानने तुनिषाला कानशिलात लगावली होती. माझ्या मुलीला आता मी गमावलं आहे. पण जोपर्यंत तिला न्याय मिळत नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही.”