चिन्मय मांडलेकर तुकारामांच्या भूमिकेत
ई टीव्ही मराठीवर लवकरच संत तुकाराम आणि आवली यांच्या संसाराची गाथा मांडणारी ‘तुका माझा सांगाती’ ही नवी मालिका सुरू होत असून या मालिकेत अभिनेता चिन्मय मांडलेकर ‘तुकाराम’ साकारत आहे. मालिकेचे दिग्दर्शन संगीत कुलकर्णी करत असून ‘आवली’च्या भूमिकेत मृण्मयी सुपाळ ही अभिनेत्री आहे. पुढील महिन्यात आषाढी एकादशीपासून (९ जुलै २०१४) ही मालिका प्रसारित होणार असल्याचे समजते. पुढच्या आठवडय़ापासून चिन्मयच्या ‘संत तुकाराम’ यांच्या रूपातील जाहिराती सुरू होणार आहेत. मालिकेतील तुकाराम यांच्या भूमिकेसाठी अनेक कलाकारांच्या ‘ऑडिशन्स’ घेण्यात आल्या. चिन्मय मांडलेकर यानेही ऑडिशन दिली आणि त्यानंतरच त्याची या भूमिकेसाठी निवड झाल्याचे ई टीव्ही मराठीच्या सूत्रांनी सांगितले. ई टीव्ही मराठीच्याच ‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला’ मालिकेत ‘ईश्वरी’ची भूमिका करणारी मृण्मयी या मालिकेत ‘आवली’ साकारणार आहे. या मालिकेसाठी संत तुकाराममहाराज यांचे वंशज आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या संदर्भात मालिकेचे दिग्दर्शक संगीत कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता ‘वृत्तान्त’ला ते म्हणाले की, तुकाराम आणि आवली यांचा अनोखा संसार होता. म्हणूनच ‘आवली यांच्या नजरेतून तुकाराम’ मांडण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तुकाराम महाराज संसारात राहून संतपदाला पोहोचले ते त्यांचे वेगळेपणे आहे. ते मांडताना त्यांची पत्नी आवली यांना डावलून चालणार नाही. ही मालिका म्हणजे तुकाराम यांची बखर नाही. त्यामुळे मालिकेकडे एक कलाकृती म्हणूनच पाहावे. मालिकेतून कोणाच्याही भावना दुखाविल्या जाणार नाहीत, याची काळजी आम्ही घेतली आहे.
तुका माझा सांगाती!
ई टीव्ही मराठीवर लवकरच संत तुकाराम आणि आवली यांच्या संसाराची गाथा मांडणारी ‘तुका माझा सांगाती’ ही नवी मालिका सुरू होत असून या मालिकेत अभिनेता चिन्मय मांडलेकर ‘तुकाराम’ साकारत आहे.
आणखी वाचा
First published on: 19-06-2014 at 08:51 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tuza maza sangati