प्रेमकथापट, नायक-नायिकांची  गाणी, एखादे पावसातले गाणे, प्रेमाच्या आणाभाका असे ठरीव फॉम्र्युल्यातले चित्रपट हिंदीत तर भरमसाट आहेतच, पण मराठीतही खूप येऊन गेले आहेत. त्याऐवजी अप्रतिम छायालेखनाच्या मदतीने सरळसाधी, वास्तवाला जवळची अशी प्रेमकथा ‘तुझी माझी लव्हस्टोरी’द्वारे चित्रपटकर्त्यांनी पडद्यावर मांडली आहे. चित्रपटाला असलेला ‘फ्रेश लूक’ आणि श्रुती मराठे-गौरव घाटणेकर ही नवीन जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने पडद्यावर आली आहे.
२०-२५ वर्षांचा इंद्रनील आणि त्याच्यापेक्षा ५-६ वर्षांनी मोठी असलेली अदिती यांच्यातील प्रेमाची ही सरळसाधी गोष्ट आहे. खरेतर प्रेमकथेमध्ये आतापर्यंत मराठीत तरी एकाच वयाच्या नायक-नायिका दाखविण्यात आल्या आहेत. या चित्रपटात मात्र नायक आपल्यापेक्षा मोठय़ा वयाच्या नायिकेच्या प्रेमात पडतो हे एक वेगळेपण आहे. जेजेमधून चित्रकारितेचे शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या सधन घरातील इंद्रनीलने आयुष्यात नक्की काय करायचे हे ठरविलेले नाही. एकदा त्याच्या बहिणीची मैत्रीण अदिती मुंबई भेटीवर येते. बहीण आणि तिची मैत्रीण यांच्याबरोबर ड्रायव्हर म्हणून फिरणे एवढेच काम इंद्रनील करतो. त्यादरम्यान नकळत तो अदितीच्या प्रेमात पडतो. पण गोव्याच्या अदितीचे लग्न गोव्यातीलच एका तरुणाशी ठरलेले आहे. सरळसाधी प्रेमकथा पडद्यावर मांडताना दिग्दर्शकाला छायालेखकाची उत्तम साथ लाभली आहे. नेहमीपेक्षा निराळ्या पद्धतीचे ‘टेकिंग’ हे या चित्रपटाचे वैशिष्टय़  श्रेयनामावलीपासूनच प्रेक्षकाला जाणवते. आधीच लग्न ठरलेली, आपल्यापेक्षा वयाने मोठय़ा असलेल्या अदितीवर प्रेम करणे हे इंद्रनीलचा मित्र गोली याला पटत नाही. ‘तू काय येडा आहे का’ हे गोलीचे पालुपद तो कायम इंद्रनीलला ऐकवत राहतो. एक प्रकारे गोली या व्यक्तिरेखेतून प्रेक्षकांचे मत व्यक्त करीत इंद्रनीलला तू चुकतोयस, आपल्यापेक्षा मोठय़ा वयाच्या मुलीवर प्रेम कसे करू शकतोस असे सांगण्याचा प्रयत्न दिग्दर्शक करतो. पण इंद्रनील आपल्या मतावर ठाम आहे आणि गोव्याला जाऊन अदितीचा साखरपुडा होण्याच्या आधी तिला आपल्या मनातले सांगून टाकायचे असे इंद्रनील ठरवतो. आजच्या तरुणाईची भाषा संवादातून चांगल्या प्रकारे मांडण्याचा प्रयत्न संवादलेखकाने केला आहे. प्रेमकथापट म्हटल्यावर अपेक्षित असलेली गाणी, संगीत हेसुद्धा चित्रपटाच्या लयीला साजेसे आहे. सरळसाधी, थेट मांडणी करताना दिग्दर्शक  मध्यंतरानंतर वेगळ्या वळणावर जाईल असे प्रेक्षकाला वाटत राहते. परंतु ही अपेक्षा चित्रपट पूर्ण करीत नाही. मात्र छायालेखनाबरोबरच गौरव घाटणेकरने साकारलेला इंद्रनील, श्रुती मराठेने साकारलेली अदिती आणि या व्यक्तिरेखांना पूरक अभिनय करणारा गोलीच्या भूमिकेतील संकेत मोरे यांनी चांगला अभिनय केला आहे. गौरव घाटणेकरचा पहिलाच चित्रपट असून त्याने व्यक्तिरेखा साकार करण्यासाठी मेहनत घेतली आहे. चित्रपट सुरू झाल्यानंतर थोडय़ाच अवधीत नायकाचे प्रेम एकतर्फी आहे असे जाणवते, पण त्याच्या प्रेमाला नायिकेने प्रतिसाद द्यावा अशी अटकळ बांधत प्रेक्षक त्या दोघांच्या भेटीची वाट पाहण्यात मग्न होतो. ही उत्कंठा अतिशय साधेपणाने, फिल्मिगिरी किंवा तद्दन फॉम्र्युला टाळत कायम ठेवण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरतो. पण म्हणूनच अनोख्या वळणावर चित्रपट जाईल अशी अपेक्षा प्रेक्षक करतो, पण चित्रपट ती पूर्ण करू शकत नाही. उत्तम छायालेखन, अभिनय, संगीत असलेला हा चित्रपट एक सरळसाधी प्रेमकथा थोडय़ाशा वेगळ्या वळणाने उलगडतो.
तुझी माझी लव्ह स्टोरी
निर्माता – ऋषिकेश मोरे
लेखक-दिग्दर्शक – ऋषिकेश मोरे
छायालेखक – अर्जुन सोरटे
संवाद – प्रशांत लोके
संगीत – बापी-तुतूल
कलावंत – श्रुती मराठे, गौरव घाटणेकर, संकेत मोरे, कल्पना साठे, उदय लागू, नेहा बाम, अशोक कुलकर्णी, मृणालिनी जांभळे, श्रीकांत कामत, वरद चव्हाण, प्रशांत नेमण, श्रीराम कुलकर्णी.

Story img Loader