‘चालतंय की’ म्हणत समस्त मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील पहिलवान गडी राणादाची लोकप्रियता प्रचंड आहे. त्याच्यासोबतच या मालिकेतील असेही काही कलाकार आहेत ज्यांची भूमिका लहानशी आहे. मात्र तरीदेखील ते प्रेक्षकांच्या मनातील ताईत झाले आहेत. या कलाकारांपैकीच एक कलाकार म्हणजे बरकत. बरकत या नावाने घराघरात पोहोचलेला अमोल नाईक नुकताच लग्नाच्या बेडीत अडकला असून अंजलीबाई आणि राणादाने या लग्नाला हजेरी लावली. सध्या या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
छोट्या पडद्यावरील कोल्हापूरच्या गायकवाड कुटुंबाची गोष्ट सांगणारी मालिका म्हणजे ‘तुझ्यात जीव रंगला’. यामध्ये रणविजय उर्फ राणादा (हार्दिक जोशी) आणि पाठक बाई म्हणजे अंजली (अक्षया देवधर ) यांच्या प्रेमापासून ते लग्न आणि नंतरच्या अनेक अडचणींमध्ये राणादासोबत असणारा मित्र म्हणजे बरकत. ऑनस्क्रीनप्रमाणे ऑफस्क्रीनवर देखील अमोल आणि राणादा, अंजली यांची मैत्री असून त्याच्या लग्नात राणादा-अंजलीने हजेरी लावली होती. अमोल नाईक याचा नुकताच पूजा हिच्यासोबत विवाह पार पडला.
गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ सुरु असलेल्या ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत बरकत हा सुरुवातीपासूनच मालिकेचा एक भाग आहे. या मालिकेमध्ये राणादाचे बरकत आणि त्याचा लाडका बैल साहेबराव हे दोनच खास मित्र आहेत. त्यामुळेच रिअल लाईफमध्येही राणाने त्याचा खास दोस्त असलेल्या अमोल नाईकच्या लग्नाला हजेरी लावली.