छोट्या पडद्यावर विशेष गाजलेली आणि अफाट लोकप्रियता मिळविलेली ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका आता रंजक वळणावर आली आहे. राणादा-अंजली यांच्यातलं प्रेम, राणादाचा मृत्यू होणं, तो नसताना नंदिता वहिनींनी केलेलं कटकारस्थान आणि पुन्हा मालिकेमध्ये राणादाची झालेली एण्ट्री असे अनेक चढउतार मालिकेमध्ये पाहायला मिळाले. या साऱ्यामध्ये नंदिता वहिनींनी उत्तमरित्या अभिनय करत भूमिकेला खऱ्या अर्थाने न्याय दिला. त्यांच्यामुळे मालिकेची रंगत खऱ्या अर्थाने वाढली. मात्र आता यापुढे मालिकेमध्ये नंदिता वहिनी प्रेक्षकांना दिसणार नाही. लवकरच त्या या मालिकेचा निरोप घेणार आहेत.
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमध्ये नंदिता वहिनी ही महत्त्वाची भूमिका अभिनेत्री धनश्री काडगांवकरने साकारली आहे. २०१६ मध्ये सुरु झालेली ही मालिका अल्पावधीमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मनं जिंकली. मात्र नंदिता वहिनींच्या अभिनयाची आणि त्यांच्या स्टाइलची प्रेक्षकांमध्ये विशेष चर्चा रंगली. या मालिकेमध्ये ज्याप्रमाणे राणादा आणि अंजली या महत्त्वाच्या व्यक्तीरेखा आहेत. तशीच वहिनीसाहेबांचीही आहे. मात्र आता त्या मालिकेचा निरोप घेणार आहेत. धनश्री काडगांवकरने फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली.
या मालिकेमध्ये लवकरच राणादा पोलिसांच्या भूमिकेत पाहायला मिळणार असून नंदिता वहिनींची आता एक्झिट होणार आहे. धनश्रीने फेसबुकवर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. यावरुन हे फोटो तिच्या अखेरच्या दिवसाच्या चित्रीकरणाचे असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान,नंदिताच्या एक्झिटनंतर राणादाची मुलगी “लक्ष्मी रणविजय गायकवाड” हिची देखील नव्याने एण्ट्री होणार आहे. त्यामुळे ही मालिका आता आणखीनच रंजक होणार आहे.