सोनी वाहिनीवरील ‘एन्काऊंटर’ मालिकेतून दर आठवडय़ाला एका कुख्यात गँगस्टरच्या एन्काऊंटरची गोष्ट दाखवली जाते. ‘एन्काऊंटर’च्या येत्या भागात पहिल्यांदाच उन्नती या महिला गँगस्टरची कथा उलगडण्यात येणार आहे. आणि त्यानिमित्ताने छोटय़ा पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री बरखा बिश्त प्रथमच एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे.
बरखाने याआधी अनेक मालिकांमधून मध्यवर्ती भूमिका केल्या आहेत. पण, नकारात्मक भूमिकेत दिसण्याची ही तिची पहिलीच वेळ आहे. केवळ आपल्या सौंदर्याचा उपयोग करत गुन्हेगारी विश्वात शिरलेल्या उन्नतीने अगदी थोडय़ाच कालावधीत आपला प्रियकर उल्हासच्या सहाय्याने तिथे आपला जम बसवला. पण, नंतर उन्नतीच्या मनात उल्हासबद्दल संशयाचे विष भरत गेले आणि त्यातून ती उल्हासच्या एन्काऊंटरला जबाबदार ठरली होती. ‘पुरुषांना मोहिनी घालणाऱ्या गँगस्टरची भूमिका साकारणे माझ्यासाठी आव्हानात्मक होते. त्यामुळे कथा ऐकल्यावर मी लगेचच होकार दिला. माझे काम माझ्या चाहत्यांना आवडेल ही अपेक्षा आहे,’ असे मत बरखाने व्यक्त केले.