नुकताच होळीचा सण साजरा केला. मनोरंजनसृष्टीतील अनेकांनी होळीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अशातच एक अभिनेत्रीचा विनयभंग झाल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी मुंबई(Mumbai)तील पश्चिम उपनगरात होळीच्या पार्टीत ही घटना घडली आहे. पीडित अभिनेत्रीने तिच्या सहकलाकाराने तिचा विनयभंग केल्याची तक्रार दाखल केली आहे.

अनेक मालिका आणि काही सीरीजमध्ये प्रमुख भूमिकेत दिसलेल्या २९ वर्षीय अभिनेत्रीने ही तक्रार दाखल केली आहे. सध्या ती एका एंटरटेनमेंट चॅनेलबरोबर काम करत आहे. अभिनेत्रीने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या कंपनीने होळीची पार्टीची आयोजित केली होती. कंपनीच्या टेरेसवर ही पार्टी होती. या पार्टीत ३० वर्षीय सहकलाकारसुद्धा उपस्थित होता. त्याने खूप मद्यप्राशन केले होते. पोलिसांना दिलेल्या जबाबात अभिनेत्याने तिच्याबरोबर गैरवर्तणूक केल्याचे म्हटले.

अभिनेत्रीने म्हटले, “तो माझ्यावर आणि पार्टीतील इतर स्त्रियांवर रंग टाकण्याचा प्रयत्न करत होता. मला त्याच्याबरोबर होळी खेळायची नव्हती. त्यामुळे मी नकार दिला आणि मी त्याच्यापासून दूर गेले. मी तिथून गेले आणि पाणीपुरीच्या स्टॉलमागे लपले. पण, तो माझ्यामागे आला आणि मला रंग लावण्याचा प्रयत्न करू लागला. मी स्वत:चा चेहरा झाकला. पण त्याने मला जबरदस्तीने पकडले आणि माझ्या गालाला रंग लावला. त्यानंतर तो मला म्हणाला की माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मी बघतो की तुला माझ्यापासून कोण वाचवतं. त्यानंतर त्याने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आणि रंग लावला. मी त्याला ढकलले. मला धक्का बसला होता. त्यानंतर मी सरळ वॉशरूममध्ये गेले”, असे अभिनेत्रीने एफआयआरमध्ये सांगितले.

अभिनेत्रीने घडलेला प्रकार तिच्या मित्रांना सांगितला. जेव्हा त्यांनी अभिनेत्याला याबद्दल विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्याशीदेखील त्याने गैरवर्तन केले. त्यानंतर अभिनेत्रीने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. पोलिस ठाण्यातील एका उपनिरिक्षकाने यावर बोलताना म्हटले की अभिनेत्रीच्या तक्रारीवरून, आम्ही आरोपी पुरुष कलाकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याला नोटीस बजावली असून प्रकरणाची चौकशी करत आहोत. आम्ही पार्टीत उपस्थित असलेल्या इतरांचे जबाब नोंदवण्यात येतील. तसेच तेथील सीसीटीव्ही फुटेजदेखील तपासण्यात येणार आहे. आरोपी कलाकारावर भारतीय न्याय संहितेच्या सेक्शन ७५(१)(i) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.