सोमवार ते शनिवार मालिकांचा रतीब घातल्यानंतर एखादा रविवार असा उजाडतो की चॅनलवर संध्याकाळी पुरस्कारांचा कार्यक्रम सुरू होतो. त्यात ना नावीन्य असतं, ना वेगळेपणा. सगळाच्या सगळा सरधोपट मामला..
देवांचे वार असतात. जसं शनिवार मारुतीचा तर दत्ताचा गुरुवार. तसं टीव्ही क्षेत्राचे वारही ठरलेले. सोम ते शुक्र हे सरधोपट वार. मजकूर टंचाईमुळे आता शनिवारचीही यात भर पडली आहे; पण एका खास गोष्टीसाठी आम्ही रविवार राखून ठेवतो- पुरस्कार सोहळ्यांसाठी. शाबासकी, प्रशंसा, कौतुक कोणाला नको असतं. केलेल्या कामाला प्रोत्साहन आणि नवं काम जोमानं करण्यासाठी हुरूप मिळतो. घराच्या चार भिंतींत घरच्यांकडून मिळणारी वाहवा मर्यादित असते; पण हेच कौतुक चारचौघांत जाहीरपणे असेल तर त्याची व्याप्ती वाढते. पुरस्कार हे कौतुक, प्रशंसेचा विस्तारित टप्पा. तर रविवार हा पुरस्कारांसाठीचा हुकमी वार. आता समस्त चाकरमानी मंडळी आपलं संसाररूपी रहाटगाडगं रेटण्यातच मश्गूल असतात. वेढलेल्या प्रश्नांची सरबत्ती पार करता करता त्यांची तारांबळ उडते. घरचं आणि दारचं (अहो, म्हणजे कचेरीतलं) अशी दोन विश्वं सांभाळताना दिवस कसा उजाडतो आणि मावळतो हे लक्षातदेखील येत नाही; पण रविवार या साचलेपणाला अपवाद. उशिरा उठून, निवांत चहा आणि सोबतीला ताजे वर्तमानपत्र, मग आरामशीर आवरणं, मग रमेगमे बाजारभ्रमंती, फक्कड जेवणाचा बेत झाल्यावर मंडळी वामकुक्षीही घेतात. बघता बघता संध्याकाळ होते आणि टीव्हीवर सुरू होते पुरस्कार पर्व. ००१ पासून ७९१ पर्यंत कोणताही चॅनेल लावा, असा भव्य शामियाना तुमच्या नजरेस पडेल, बरेच हूज हू तुम्हाला शामियानासमोरच्या गर्दीत दिसतील. अबक प्रायोजित आणि पॉवर्ड बाय डइफ अशा मालगाडी नावाचा पुरस्कार सोहळा सुरू असेल. चर्चेत असणारे आणि नाकीडोळी नीटस मंडळी अँकर म्हणून पोडियमवर दिसतील. चॅनेल जरा तब्येतीत चालणारं असेल तर अँकरच्या कानात कोकणातल्या नागमोडी रस्त्यासारखा एका माइक असेल. डोकं, कान आणि तोंड असा पसाराभर तो माइक म्हणजे टेक्नोसॅव्हीपणाची खूण. अँकर क्षेत्रातल्याच कोणाला तरी पुरस्कार द्यायला बोलावतात. एक स्त्री आणि एक पुरुष असं साधारण समीकरण ठरलेले असतात. संगीत वाजतं, टाळ्या वाजतात, ते दोघं येतात. अँकर मानांकनांसाठी प्लीज वगैरे म्हणतात. तब्बल आठ-दहा सेकंदांनंतर मानांकितांच्या थप्प्या सुरू होतात. इकडे घरी बसलेले व्याकरणतज्ज्ञ ही नामांकनं आहेत असा खल करतात. यजमानबाई खेकसतात, अहो, जरा ऐकू द्या कोणाला देणारेत पुरस्कार. मग चिडीचूप शांतता. सात-आठ अशी मानांकने असतात. नामांकित व्यक्तींचे चित्रपट, मालिकेतले प्रसंग मोठय़ा स्क्रीनवर दिसत असताना, तुम्हाला स्क्रीनवर प्रेक्षकांत बसलेल्या त्याचा किंवा तिचा चेहरा दाखवतात. तो असेल तर जरा शर्ट चापून नीट बसतो. ती असेल तर विचारूच नका. ओठांवर निम्मी केलेली लिपस्टिक अशी मुडपून, अगदी बटरफ्लाय इन स्टमक अशी पोझ घेऊन ती बसलेली दाखवतात. इव्हेंटवाल्यांनी दिलेला कागदाचा चिटोरा ते दोघं उघडतात. चेहऱ्यावर ओह! असे भाव. मग प्रेक्षकांना साद घालतात. एनी गेस, मग वायव्य कोपऱ्यातून तिच्या समर्थकांचा गलका होतो. तेवढय़ात आग्नेय दिशेकडून तिच्या नावाचा पुकारा होतो. दोन्ही गट आपापल्याच पुरस्कार मिळणार म्हणून भलतेच तय्यार असतात आणि मग पुरस्कार देण्यासाठी आलेले दोघे असं मिश्कील हसतात आणि जाहीर करतात.. सुखी सदरा पुरस्कार मिळतोय अमुकला.. मग सभागृहाच्या अगदी मध्यात, म्हणजे उजवीकडच्या किंवा डावीकडच्या किमान पाच लोकांना जागा करून द्यावी लागेल अशा ठिकाणी बसलेल्या ती किंवा त्याला पुरस्कार मिळतो. तो असा उभा राहितो. आजूबाजूचे लोक जागा करून द्यावी जायला, अशा विचारात कामाला लागतात. हा जागेवरूनच आधी मागच्या रांगेतला किमान तीन लोकांना मिठी मारतो, मग पुढच्या रांगेतल्या किमान दोघांना. मग येस्स वगैरे. मग बसलेल्या ठिकाणाहून व्यासपीठाच्या पाठी जाईपर्यंत मूव्हिंग कॅमेरा येतो. मग तो व्यासपीठावर जाण्यासाठी उभारलेल्या पायऱ्यांवर पोहोचतो. सात-नऊ अशा विषम संख्येत असलेल्या सगळ्या पायऱ्यांना नमस्कार करत तो व्यासपीठावर जातो. पुरस्कार देण्यासाठी आलेल्या मॅडमना नमस्कार आणि सरांना मिठी. मग पुरस्कार दिला जातो. पुरस्कार आणि अन्य गोष्टी देण्यासाठी मागे आलेल्या ललनांवरही कॅमेरा रेंगाळतो. मग अँकर पुरस्कार विजेत्याला किंवा विजेतीला मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतात. तो माइक घेतो. काही जण सुज्ञपणे थोडक्यात आटोपतं घेतात, पण काही वात आणतात. पार पहिलीत केलेल्या बालनाटय़ात मार्गदर्शन करणाऱ्या सरांपासून सगळ्यांचा उल्लेख करतात. मग आणखी काही पुरस्कारांची खैरात होते. मग अँकर जाहीर करतात- सादर करत आहोत एक धमाल नृत्याचा आविष्कार. क्षणिक काळोख होतो. मग संगीत सुरू होतं. सोहळा चित्रपटांचा असेल तर लेटेस्ट चित्रपटांतली नायक-नायिका, सोहळा मालिकांचा असेल तर सगळ्यात खपणीय मालिकेतला नायक-नायिका येतात. त्या दोघांना पाहताच त्यांच्या टीममधली मंडळी चीत्कारू लागतात. चित्रपटांच्या सोहळ्यात सोलो परफॉर्मन्स ठेवतात. नायकाचा परफॉर्मन्स सुरू असताना त्याच्या करंट गर्लफ्रेंडवर कॅमेरा स्थिर होतो. तिलाही याची कल्पना असते. उदाहरणार्थ रणवीर बाजीराव-मस्तानीच्या गाण्यांवर नाचत असेल, तर एकदा तुम्हाला रणवीर दिसतो, लगेच दीपिका दिसते. पार्टनरच्या कमाल परफॉर्मन्सने सॉलिड असे भाव तिच्या चेहऱ्यावर. परफॉर्मन्स संपतो. तो तिच्या दिशेने हावभाव करून निरोप घेतो. ती खूश होऊन फ्लाइंग किस वगैरे देते. पुरस्कार वाटता वाटता गाणी किंवा परफॉर्मन्सच्या मध्ये मध्ये पुरस्कार असं साधारण पुढचे तीन तास सुरू असतं. मंडळी बेतशीर असतील तर साडेसातला सुरू झालेलं दुकान साडेदहापर्यंत आटोपतं; पण मंडळी भारीभक्कम असतील तर दोन पुरस्कार, एक परफॉर्मन्स झाल्यावर किमान दहा मिनिटांचा ब्रेक होतो. ब्रेक होतानाच कमिंग अप काय ते दाखवण्यातही भरपूर मिनिटं जातात. तुम्हाला जे नेमकं बघायचं असतं ते वारंवार कमिंग अपमध्ये दाखवतात. ३७ कमिंग अप पाहून तुम्ही कंटाळून जाता आणि प्रत्यक्षात तुम्हाला जे पाहायचं असतं ती किंवा तो येईपर्यंत तुमचा उत्साह आटून गेलेला असतो आणि चॅनेल प्रायोगिक विचारांचं असेल तर अँकरवरची जबाबदारी वाढते. टेलिप्रॉम्पटरवरचं बोलण्याबरोबरच त्यांना अंगविक्षेप, मुलाखतींसाठी पायपीटही करावी लागते. म्हणजे त्यांनाही थोडं परफॉर्म करावं लागतं. काही वेळेला पोडियम सोडून पार प्रेक्षकांत यावं लागतं. मग महाबाळबोध प्रश्नमंजूषासदृश काही तरी होतं किंवा जराही हसायला येणार नाही असे पीजे फेकले जातात. आता एवढं आलोच आहोत तर हसू थोडं म्हणून मंडळी हसतात. आता तीन तास शो रेटायचा म्हटल्यावर काही तरी स्पाइसी करावंच लागतं. मग अँकर एकमेकांवरच कोटय़ा करतात. कोटींसाठी काय करावं लागेल सांगता येत नाही. चित्रपट असोत किंवा मालिका किंवा दोन्हीचे एकत्रित- दर रविवारी पुरस्कार सोहळ्यांचे नाटय़ रंगते. आठवडाभराची पेंडिंग कामं उरकल्याने मंडळीही मोकळी असतात. आम्हाला अजूनही कळलेले नाही की, हे एवढे ढिगावरी पुरस्कार देतं तरी कोण? पुरस्कार सोहळा नाही असा रविवार उजाडत नाही. हल्ली तर पुरस्कार देणारे संभाव्य पुरस्कारविजेत्यांसह तमाम इंडस्ट्रीवासीयांना कुठे तरी घेऊन जातात. म्हणजे अज्ञातस्थळी नाही- पर्यटनाला. दुबई, लंडन, स्पेन. पत्रकारांनाही नेतात. मग सगळेच मिळून जिवाचा स्पेन वगैरे करतात. खाओ-पिओ-धमाल करो असं वातावरण. सकाळी ७ ते रात्री १२ अशा शिफ्ट्समधून मोकळीक होत असल्याने मंडळी खुशीने जातात. पुरस्कार मिळाला तर उत्तम, नाही मिळाला तर चिलआऊट होतं जरा. असं म्हणतात की, अति झालं की हसू येतं. एक वर्ष म्हणजे ५२ आठवडे. म्हणजे वर्षांला किमान रविवार येतात ४८. आपल्या टीव्हीवर किमान शंभर चॅनेल्स दिसतात. त्यातल्या पन्नास चॅनेल्सचे प्रत्येकी एक गृहीत धरलं तर तुम्हीच बघा किती पुरस्कार सोहळे झेलतो आपण. पुरस्कार म्हटलं की नोबेल, ऑस्कर, भारतरत्न, पद्मश्री-पद्मभूषण, अर्जुन, द्रोणाचार्य अशा देशापरदेशातील आदरणीय पुरस्कारांची नावं आणि विजेत्यांना मिळणारी स्मृतिचिन्हं डोळ्यांसमोर तरळतात; पण दर रविवारी सादर होणाऱ्या कार्यक्रमात वितरित होणाऱ्या एका तरी पुरस्काराचं नाव लक्षात राहतं? अनेकदा पुरस्कारांसाठीची मानांकने पाहून आपण चकित होतो, कारण आशयघन वगैरे म्हणावं असं काम करणाऱ्यांऐवजी सवंग, थुकरट दर्जाच्या कोणाला तरी पुरस्कार मिळतो. अशा लोकांना प्रमाणित करणारे परीक्षक तरी कोण असतात? ते स्वेच्छेने अशा लोकांना मानांकनं देतात का? त्यांच्यावर दबाव असतो? एरव्ही प्रत्येक पुरस्काराला टाळ्या वाजवणारे खरंच मनापासून दाद देतात? आतापर्यंत ज्येष्ठांनी पाठ थोपटली की आपली क्षमता सिद्ध व्हायची; पण आता कोणीही पुरस्कार देतं. अनेकदा जेमतेम एक चित्रपट केलेली व्यक्ती ज्येष्ठांना पुरस्कार देण्यासाठी व्यासपीठावर येते. कौतुक लोकांनी करावं, असंही म्हटलं जातं, कारण कुटुंबीय, नातेवाईक यांना घरातल्या माणसाचं कौतुक राहणारच. आपल्याच चॅनेलवरच्या कार्यक्रमांमध्ये बेस्ट कोण हे प्रेक्षकांना विचारलं जातं. नक्की कोण मतदान करतं, केव्हा करतं, मतदारांची संख्या किती, कुठल्या भागातली माणसं मतदान करतात हे कळतच नाही. आपल्याच बबडय़ाचं आईवडिलांनी कौडकौतुक करण्यात काय हशील आहे? पुरस्कार सोहळ्यांच्या इव्हेंटमुळे शेकडो लोकांना रोजगार मिळतो हे खरं आहे; पण प्रतिस्पर्धी चॅनेलने पहिल्या रविवारी पुरस्कार सोहळा दाखवला, मग आपण तिसऱ्या रविवारी दाखवायलाच हवा, असा हट्ट का? आणि पुरस्कार द्यावं असं खरंच काही समोर असतं का? आता खेळ मांडलाच आहे तर वाटून टाकावेत हौश्यागवश्यांना हे प्रेक्षकांना स्पष्ट होणं गरजेचं आहे. ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ असं संतांनी लिहून ठेवलंय. शाबासकी देणाऱ्यांइतकेच सूचना, सुधारणा, टीका करणारेही महत्त्वाचे असतात. पुरस्कारांच्या भाऊगर्दीत या नकोश्यांचा विचार झाला तरच सकसता वाढेल.
पराग फाटक – response.lokprabha@expressindia.com