बऱ्याच दिवसांनी दिलीप प्रभावळकर छोटय़ा पडद्यावर येणार म्हणून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ या मालिकेने मिळवलेलं यश हे त्यामागचं एक कारण. ही मालिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. त्यातल्या व्यक्तिरेखा, संवाद, मांडणी, साधेपणा हे सगळंच प्रेक्षकांना भावलं होतं. त्यामुळे प्रभावळकर यांच्या नव्या मालिकेविषयीही उत्सुकता असणं साहजिक होतं. मालिका सुरू होऊन आता एक महिना झाला. हळूहळू प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्याचा प्रामाणिक प्रयत्न ही मालिका करताना दिसत आहे. पण, गंगाधर टिपरे मालिकेसारखी पसंती या मालिकेला अजून तरी मिळालेली नाही. खरंतर इथे तुलना करण्याचं काही कारण नाही. कारण दोन्ही मालिकांचा बाज, विषय, सादरीकरण खूप वेगळं आहे. पण ही तुलना काही प्रेक्षकांकडून केली जातेय, हे नाकारता येणार नाही.
रटाळ कथानकांतून बाहेर पडून झी मराठीने हलक्याफुलक्या विषयाची मालिका सुरू केली हे चांगलंच. खरंतर रिअॅलिटी शो आणि कौटुंबिक मालिका इतकीच चौकट मराठी चॅनल्सनेही स्वत:पुरती आखून घेतली होती. पण झी मराठीने ‘चूकभूल..’च्या निमित्ताने त्यातून बाहेर यायचं ठरवलं. प्रयत्न चांगला होता. पर, बात कुछ जमी नहीं!
कलाकारांचा अभिनय चांगला आहे. दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाची जादू वेगळीच आहे. सुकन्या कुलकर्णी यांचं काम नेहमीच प्रशंसनीय असतं. त्यांना दिलेल्या व्यक्तिरेखेच्या वयात त्या सहज समरसून जातात. नयना आपटे यांनी नानींची भूमिका उत्तम साकारली आहे. पण, काही वेळा काही प्रसंगांची अतिशयोक्ती वाटते. या गोष्टी नजरेआड करायच्या असं ठरवूनही सतत खटकत राहतात. हा अतिशयोक्तीपणा कलाकाराच्या अभिनयातला नाही तर त्या व्यक्तिरेखेतलाच आहे. तो आटोक्यात आणायला हवा होता.
इतर कलाकारांचीही कामं चांगली आहेत. फ्लॅशबॅकमधील प्रसंग सध्या तरी मजेशीर वाटताहेत. पण, सारखं तेच दाखवलं तर मात्र कंटाळा येऊ शकेल. लग्न कसं ठरलं, त्या वेळी कोणी कोणाला फसवलं, कोण कसं होतं, संसारातील सुरुवातीच्या गमतीजमती हे सगळं सध्या दाखवलं जातंय. त्यात तोचतोचपणा येण्याची शक्यता आहे. कदाचित मालिकेत दाम्पत्यातील तरुणपणाची गंमत आणि वर्तमानतला खटय़ाळपणा हेच दाखवायचं असू शकतं. पण तरी तोचतोचपणा टाळण्यासाठी पुढील भागांमध्ये थोडी उत्सुकता आणायला हवी. कदाचित ती त्या भागांमध्ये दिसेलही. तुर्तास ही मालिका फ्लॅशबॅकमध्ये रमतेय. राजाभाऊ जोशी म्हणजे मालिकेतील मुख्य कलाकारांचं घर, सोसायटी, फ्लॅशबॅकमधलं घर असं सगळंच चकचकीत आणि देखणं आहे. नानी आणि घरकाम करणारी मुलगी यांच्यातली नोकझोक मजेशीर आहे. राजाभाऊ आणि टेण्या भाऊजी यांची दोस्ती धमाल आणते. शीर्षकगीतात खटय़ाळपणा डोकावतो. शीर्षकगीताची मांडणी हट के आहे. ‘आपडी थापडी टुकूर टुकूर मुसु मुसु रे मामा’ अशा गमतीदार शब्दांनी सुरुवात होणारं शीर्षकगीत वेगळं ठरतं.
एखादी मालिका यशस्वी-अयशस्वी होण्यामध्ये प्रेक्षकही तितकीच महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रेक्षकांनाही आता सवय झालीये त्याच त्या रटाळ मालिका बघण्याची, नायिकेचा अद्भुत संघर्ष झेलण्याची, नायकाचा नाकर्तेपणा सहन करण्याची आणि कुटुंबातल्या कुरघोडी करणाऱ्या व्यक्तिरेखांची! असं बरंच काही बरीच र्वष अनुभवल्यावर प्रेक्षकांना तेच ते पाहण्याची सवय होणं अगदी सहाजिक आहे. त्यामुळे काही वेगळं त्यांच्यासमोर आलं तर अतिशय चोख असल्याशिवाय प्रेक्षक ते आनंदाने स्वीकारत नाहीत, हे सत्य आहे. सध्याच्या मालिकांच्या जाळ्यात जर ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ हीच मालिका पुन्हा सुरू केली असती तरी प्रेक्षकांनी त्या मालिकेला परत उचलून धरलं असतं. पण, या नव्यासोबत फारसं काही जमून आलेलं दिसत नाही. प्रेक्षक फार चोखंदळ झालाय. व्हायलाच हवं. पण, अशा पद्धतीच्या, बाजाच्या मालिका हिंदीत चवीने बघितल्या जातात हेसुद्धा नाकारता येणार नाही. वर्षांनुर्वष चालणारी हिंदी विनोदी, हलकीफुलकी मालिका आजही फार आवडीने बघितली जाते. पण खरं तर तिच्यात आता नव्याने दाखवावं असं काहीच नसतं. तरीही ती बघितली जातेच. मग मराठीमध्ये असा प्रयत्न झाला तर मात्र तो पटकन स्वीकारला जात नाही. याचा असा अर्थ नाही की, प्रेक्षकांनी मराठीमध्ये वेगळा प्रयोग होतोय म्हणून त्या कलाकृतीचा दर्जा कसाही असला तरी त्याला स्वीकारावं.
विनोदी मालिका आणि हलकीफुलकी मालिका यात गल्लत होते. ‘चूकभूल..’ मालिकेत खटय़ाळपणा आहे मात्र त्याला सरसकट विनोदी छटेत बघता येणार नाही. शीर्षकगीत, संवाद, सादरीकरण याला विनोदी छटा असली तरी ही मालिका एका वयोवृद्ध दाम्पत्याच्या नात्यातली गंमत सांगते. त्यामुळे मालिकेकडे बघण्याचा दृष्टिकोनही इथे महत्त्वाचा ठरतो. मालिकेचा प्रयत्न चांगला आहे. गोष्टही चांगली आहे. तरीही मालिकेची भट्टी पूर्णत: जमून आलेली दिसत नाही. कदाचित त्यात कमी आहे ती खुसखुशीतपणाची. तो जमून आला असता तर मालिकेत आणखी जान आली असती! तरी तुम्हाला नेहमीच्या तरुण जोडप्यांच्या मालिका बघण्याचा वैताग आला असेल तर या वयोवृद्ध जोशी दाम्पत्याच्या संसारातला खटय़ाळपणा बघू शकता.
सौजन्य – लोकप्रभा
response.lokprabha@expressindia.com,
@chaijoshi11