गणेशोत्सव म्हटलं की, लहानथोरांपासून प्रत्येकाचाच उत्साह ओसंडून वाहत असतो. गणेशाचे गोड रूप घरी आणण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत असतो. कुठे चौरंगावरचा साधेपणा, कुठे फुलांची आरास, कुठे कल्पकतेने साकारलेले मखर अशी नाना तऱ्हेची तयारी सुरू होते. प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार उत्सव साजरा करण्याची पद्धत वेगळी असली तरी आनंद मात्र घराघरांत तोच असतो. मग अशा या गणेशोत्सवात कलाकार सामील झाले नाहीत तर नवलच. सध्या मराठी मालिकांच्या सेटवरही गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळते आहे.
डेली सोपच्या निमित्ताने दिवसरात्र घरापासून दूर चित्रीकरणात व्यग्र असणारे कलाकार सध्या आपापल्या मालिकांच्या सेटवरचा गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करताना दिसत आहेत. आपल्या घरच्या गणपतीबरोबरच प्रत्येकजण सेटवर बसवलेल्या किंवा मालिकेच्या निमित्ताने चित्रीकरणासाठी घरात आलेल्या गणरायाच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करतो आहे. अनेकांनी त्या दिवशी चित्रीकरण बंद ठेवून सेटवरच गणेशोत्सवाचा आनंद लुटण्याचे बेतही आखले आहेत. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘जीव झाला येडापिसा‘ आणि ‘घाडगे अॅण्ड सून’ मालिकेमध्ये गणपतीचे आगमन झाले असून सर्व कलाकार सध्या गणपतीच्या सेवेत दंग झाले आहेत. प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असलेली मालिकेतील ‘सिद्धी – शिवा’ आणि ‘अमृता- अक्षय’ या जोडय़ांच्या नात्यात सातत्याने विघ्नं येत आहेत. म्हणूनच या उत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या आयुष्यातील विघ्न दूर करण्यासाठी गणेशाकडे प्रार्थना केली जात आहे. ‘जीव झाला येडापिसा’ मालिके मध्ये शिवा आणि सिद्धीच्या लग्नानंतर गणपतीचे आगमन हा लष्करेंच्या घरातील पहिला आनंदाचा सोहळा असणार आहे. ढोल ताशांच्या गजरात गणेशाची स्थापना, सिद्धी, काकू आणि सोनी यांनी बनवलेले खास मोदक, गणेशोत्सवाच्या निमित्ताने घरात होणारी स्पर्धा या सगळ्या प्रसंगातून प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.
मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान कलाकारही या सोहळ्याचा पुरेपूर आनंद लुटताना दिसत आहेत. असाच काहीसा आनंद ‘घाडगे अॅण्ड सून’ मालिके तील घाडगे कुटुंबीयांमध्ये साजरा केला जातो आहे. परंतु अक्षयचे सत्य, अमृताच्या बाबांची तिच्या लग्नाबाबतची भूमिका या गोष्टीमुळे गणेशोत्सवात विघ्न तर येणार नाही ना याचीच चिंता प्रेक्षकांनाही लागली आहे. हा उत्सव केवळ चित्रीकरणापुरता असता तरी प्रत्यक्षात मात्र कलाकार त्याचा पुरेपूर आनंद घेत आहेत.
‘झी युवा’ या मराठी वाहिनीने यंदा ‘युवा गणेशोत्सवाचे’ आयोजन केले आहे. ‘फुलपाखरू’ मालिकेच्या सेटवर गणपतीचे आगमन झाले असून ‘झी युवा’ वाहिनीवरील कलाकारांसाठी हा उत्सव म्हणजे आनंदाचा सोहळा ठरणार आहे. गणेशाच्या स्वागतासाठी ‘फुलपाखरू’ मालिकेच्या संपूर्ण टीमसह इतर मालिकेतील कलाकारांनीदेखील हजेरी लावली. ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ मालिकेतील निखिल दामले व गौरी कुलकर्णी, ‘तू अशी जवळी राहा’मधील तितिक्षा तावडे आदी कलाकार या उत्सवाच्या जल्लोषात सहभागी झाले होते. ‘आराध्य ढोल ताशा पथका’च्या गजरात सर्व कलाकारांनी पारंपरिक वेशभूषा करत गणेशाचे स्वागत केले. यावेळी ढोलपथकांचा नाद पाहून यशोमान, तितिक्षा आणि निखिल यांनाही ढोल वाजवण्याचा मोह आवरला नाही. घरापासून दूर राहात असलेल्या व लांबलचक चित्रीकरणाच्या वेळापत्रकामुळे घरी जाऊ न शकणाऱ्या कलाकारांना या युवा गणेशोत्सवाच्या निमित्ताने घरातील वातावरणाचा अनुभव घेण्याची एक उत्तम संधी मिळाली.
समाजासाठी झटणाऱ्या पोलीस खात्यावर आधारित ‘एक होती राजकन्या’ या सोनी मराठी वाहिनीवरील मालिकेत खास खाकी वर्दीतील गणरायांची मूर्ती आणण्यात आली आहे. गणेशाची विविध रूपे आपण पाहात आलो आहोत, पण समाजाचे रक्षण करणाऱ्या पोलिसांच्या भूमिकेत गणेशाला पाहण्याची संधी प्रेक्षकांना या मालिकेच्या निमित्ताने मिळणार आहे. गणरायाबरोबरच या मालिकेचे निर्माते महेश कोठारे गणेशोत्सवादरम्यान मालिकेतील एका भागात दिग्दर्शक म्हणून एक छोटीशी झलक देऊ न जाणार आहेत. आपल्या बाबांच्या खुन्याच्या शोधात असणाऱ्या अवनीला गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर महेश कोठारेंकडून कोणती गोष्ट कळणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. शिवाय ‘हम बने तुम बने’ आणि ‘मी तुझीच रे’ या मालिकांच्या सेटवरही उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने मालिकेतील कलाकारांनीही काही आठवणी सांगितल्या. ‘मोलकरीण बाई’ या मालिकेतील अंबिकाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सुप्रिया पाठारे सांगतात, आम्ही गेली १४ र्वष गणपतीची प्रतिष्ठापना करत आहोत. खरं तर पाठारे कुटुंबात सर्वाचा मिळून एकच गणपती आणला जातो. पण मुलांच्या इच्छेखातर मी माझ्या घरात गणपतीची प्रतिष्ठापना करायला सुरुवात केली. आमच्या घरी शाडूच्या मातीची मूर्ती आम्ही आणतो. सजावट फुलांची असते. थर्माकोलचा वापर मी पहिल्यापासूनच टाळत आले आहे. खास बात म्हणजे आम्ही गणपतीच्या पहिल्या दिवशी घरातच छोटेखानी कार्यक्रम आयोजित करतो. जवळपास दीडशे लोक पहिल्या दिवशी गणपतीच्या दर्शनासाठी येतात. नाच, गाणी, धमाल करत गणेशाचे स्वागत केले जाते. आमच्या घरची आरती जवळपास दीड तास चालते. वर्षांतला हा दिवस अत्यंत प्रसन्न करणारा असतो. तर ‘झी मराठी’वरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील गुरुनाथ म्हणजे अभिजित खांडकेकर सांगतो, आमच्या घरचा उत्सव दहा दिवसांचा असतो. बाबांची कामानिमित्त सतत बदली होत राहायची. त्यामुळे नगर, बीड, परभणी अशा अनेक ठिकाणी आम्हाला जावे लागले, पण तरीही गणपती आणण्याची प्रथा मात्र कायम सुरु आहे. आई-बाबा सध्या नाशिकच्या घरी राहतात. तिथेच आम्ही एकत्र गणपतीचा सण साजरा करतो. मात्र, गौरी माझ्या काकांच्या घरी आणली जाते. मी आणि सुखदा न चुकता गणपतीसाठी नाशिकला जातो. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेच्या कामामुळे मी व्यग्र आहे. मात्र, तरी देखील मी चित्रीकारणातून वेळ काढून काही दिवसांसाठी नाशिकला जाणार आहे. मातीची पारंपरिक मूर्ती घरात आणायची हा नियमही आम्ही वर्षांनुवर्षे पाळत आलो आहे, असे अभिजीत सांगतो.
सेटवरचा असो वा सेटवरून बाहेर पडताच घरच्या गणपतीची तयारी असो.. प्रत्येक कलाकार या ना त्या पध्दतीने गणरायाच्या सेवत मग्न असल्याचे चित्र सध्या दिसून येते आहे. मालिकांमुळेच अगदी घरोघरी टीव्हीवर आणि टीव्हीच्या बाहेर प्रत्यक्षातही मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात सगळे ताणतणाव विसरून प्रत्येकजण रममाण होत असल्याचे पाहायला मिळते.