भारतातील सर्वात कठीण परीक्षा म्हंटली की आयआयटीच्या परीक्षेचं नाव पहिलं येतं, असे मानले जाते. पण तरीही, देशभरातील लाखो विद्यार्थी अथक मेहनत करत परीक्षेची तयारी करुन आपले हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांची मेहनत आणि त्यांना येणाऱ्या अडचणी याची गोष्ट सांगणारी वेब सीरिज म्हणजे ‘कोटा फॅक्टरी’. द व्हायरल फीवर (टीव्हीएफ) या यूट्यूब चॅनेलवरच्या या सीरिजला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले असून लवकरच या सीरिजचा दूसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या सीरिजच्या दुसऱ्या सिझनचा टीझर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
‘कोटा फॅक्टरी’ ही कथा आयआयटीची तयारी करणारे विद्यार्थी, कोचिंग सेंटर इंडस्ट्री आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्यात घडणारे बदल याभोवती फिरते. सादरीकरणात एक नवा प्रयोग करत या सीरिजचा पहिला सिझन ‘ब्लॅक अॅण्ड व्हाईट’मध्ये दाखवण्यात आला आहे. कोटा फॅक्टरीमध्ये वैभव या १६ वर्षांच्या मुलाची कथा आहे जो जेईई पास करून आयआयटीमध्ये जाण्याचे स्वप्न घेऊन कोटाला येतो. आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाच्या आणि कठीण परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या आयआयटी इच्छुकांच्या दैनंदिन जीवनातील ताणतणाव, चढउतार यात दाखवण्यात आले आहेत. वेगवेगळ्या कोचिंग सेंटरच्या प्राध्यापकांना भेटणे, चीटिंग करणे, चुकीच्या गोष्टी करण्याची सोपे मार्ग शोधणे..आयआयटी इच्छुकांच्या आयुष्यातील अगदी ए-टू-झेड गोष्टींचा समावेश या सीरिजच्या पहिल्या सिझनमध्ये दाखवण्यात आला आहे. पहिल्या सिझनच्या यशानंतर आता या सीरिजचा दूसरा सिझन २४ सप्टेंबेर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या टीझर कडे पाहून प्रेक्षक असा अंदाजलावत आहेत की येणारा सिझन सुद्धा आधी प्रमाणेच धमाकेदार असणार आहे.
‘कोटा फॅक्टरी’ मध्ये मयूर मोरे वैभव ची जितेंद्र कुमार जीतू ची अहसान चन्ना ही शिवानी ची भूमिका साकारत आहेत. ‘कोटा फॅक्टरी’ या टीव्हीएफ ओरिजनल सीरिजचे दिग्दर्शन राघव सुब्बू यांनी केले असून आता ही सीरिजचा पहिला आणि दूसरा सिझन तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकणार आहात.