अभय महाजन हे नाव आज बऱ्याचजणांना लक्षात आलं नाही तरीही, ‘पिचर्स’मधला ‘मंडल’ म्हणताच जवळपास सर्वांच्याच चेहऱ्यासमोर पिचर्समधला साधाभोळा पण, तितकाच तरबेज चेहरा डोळ्यांसमोर येतो. तोच हा अभय महाजन. नाटक, रंगभूमी आणि अभिनय विश्वात अभय काही नवा नाही. पण, तो खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना आपलासा वाटला ते म्हणजे त्याने साकारलेल्या ‘मंडल’ या भूमिकेमुळे. असा हा लाडका ‘मंडल’ म्हणजेच अभय एका मराठी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मकरंद माने दिग्दर्शित ‘रिंगण’ या चित्रपटातून अभय प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. पण, या ट्रेलरमध्ये अभयची झलक पाहायला मिळाली नव्हती, त्यामुळे त्याच्या भूमिकेविषयी प्रेक्षकांमध्येही बरीच उत्सुकता लागून राहिल्याचं पाहायला मिळालं. हीच उत्सुकता फार न ताणता खुद्द अभयनेच ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी संवाद साधताना या चित्रपटातील त्याच्या भूमिकेवरुन पडदा उचलला आहे. या भूमिकेविषयी सांगताना अभय म्हणाला, ”रिंगण’ ही वडील मुलाच्या नात्याभोवती फिरणारी कथा आहे.

परिस्थितीमुळे गावाकडून शहराकडे आलेल्या, आई नसलेल्या एका निरागस मुलाच्या अगदी जवळच्या मित्राच्या भूमिकेतून मी तुमच्या भेटीला येणार आहे. आई नसल्यामुळे चित्रपटात त्या लहान मुलाला जे प्रश्न पडत असतात, त्या प्रश्नांमधून त्याला सावरत एक दिशा दाखवणाऱ्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत मी दिसेन. मुख्य म्हणजे त्या मुलाचे आणि मी साकारत असलेल्या पात्राचे सूर जुळण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे माझ्या पात्राच्या जीवनातील काही दिवस. मी साकारत असलेल्या पात्रानेही त्याच परिस्थितीतून प्रवास केला आहे. त्यामुळेच माझ्या आणि साहिलच्या (बालकराच्या) भूमिकेत हा दुवा आहे असं म्हणायला हरकत नाही.’

सहसा बालकलाकारांसोबत काम करणं तसं आव्हानात्मक असतं. पण साहिल आणि अभयची केमिस्ट्री त्या आव्हानांपासून बरीच दूर होती, असं अभयच्या बोलण्यातून स्पष्ट झालं. साहिलसोबत ट्युनिंग जुळण्यासाठी काही खास प्रयत्न करावे लागलेच नाहीत कारण, आम्ही एकमेकांचे जुने मित्र असल्याप्रमाणे आमचं मैत्रीचं नातं जुळलं होतं, असं अभेयने आवर्जून सांगितलं.

दुःखात असताना नेहमीच एखाद्या चमत्काराची अपेक्षा केली जाते. त्याचाच आधार घेत गुंफलेली ही कथा अनेक पुरस्कारांवरही छाप पाडून गेली. पण, राष्ट्रीय पुरस्कारांवर ठसा उमटवणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळणार का हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा. याविषयी आपलं मत मांडत अभयने एक अभिनेता आणि प्रेक्षक म्हणून त्याची प्रामाणिक प्रतिक्रिया दिली. ‘कोणत्याही मोठ्या कलाकाराचा चेहरा नसतानाही आशयघन चित्रपट प्रदर्शित होणं, त्यांना पुरस्कार मिळणं ही खरंतर प्रोत्साहनपर बाब आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनामध्ये झालेल्या दिरंगाईविषयी सांगायचं झालं तर, त्यामध्ये मार्केटिंग आणि पैशांची बरीच गणितं असतात. खरंतर हे घटकही चित्रपटासाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे या घटकांच्या बाबतीत काही मर्यादा होत्या खऱ्या. पण, आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे हे महत्त्वांचं. आशयघन चित्रपट आणि राष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये नावाजलेल्या चित्रपटांबद्दल प्रेक्षकांच्या मनात एक प्रकारचा न्यूनगंड आहे. असे चित्रपट सहसा जास्तच गंभीर असतात असा जो समज आहे तो दूर सारुन प्रेक्षकांनी चित्रपट पाहण्यासाठी जरुर यावं कारण ही कथा प्रत्येकाला आपलीशी वाटणार आहे’, असं म्हणत अभयने त्याचं मत मांडलं. तेव्हा पंढरपुरात खुललेलं हे रिंगण अमुभवण्यासाठी आता प्रेक्षकांची तिकीटबारीवर गर्दी होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ‘प्रयत्नांनी सुटेल आत्मविश्वासाने तुटेल’ अशा टॅगलाईनसह हा चित्रपट ‘रिंगण’ ३० जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

शब्दांकन- सायली पाटील
sayali.patil@indianexpress.com

पाहा : VIDEO स्टुडिओबाहेर गुंडांनी भाऊ कदमवर पिस्तुल रोखलं

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tvf pitchers fame actor abhay mahajan aka mandal reveals his role in national award winning movie ringan
Show comments