विनोदबुद्धी आणि विनोदाच्या परफेक्ट टायमिंगसाठी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार ओळखला जातो. कदाचित यासाठीच त्याला ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कॉमेडी शोमध्ये परीक्षक म्हणून बसवलं गेलं असावं. मात्र या शोमध्ये त्याने सहपरीक्षक मल्लिका दुआसाठी वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दांमुळे वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावरही या मुद्द्यावरून बरीच चर्चा झाली. याप्रकरणी आता अक्षयची पत्नी ट्विंकल खन्नाने त्याची बाजू घेतली आहे. ट्विटर पोस्टद्वारे ती सविस्तरपणे तिचं मत मांडलं आहे.
जो स्पर्धक उत्तमरित्या सादरीकरण करतो, त्याच्यासाठी मंचावरील एक घंटा वाजवली जाते. नकलाकार श्याम रंगीलाच्या सादरीकरणानंतर मल्लिकाने घंटा वाजवली असता, अक्षयने तिला म्हटले की, ‘आप बेल बजाओ, मै आपको बजाता हूं’ आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मल्लिकाचे वडील आणि पत्रकार विनोद दुआ यांनीसुद्धा आक्षेप घेत अक्षयवर जोरदार टीका केली.
— Twinkle Khanna (@mrsfunnybones) October 29, 2017
यासंदर्भात ट्विंकलने ट्विट केलं की, ‘अक्षयने मस्करीत तो संवाद वापरला, जो पुरुष आणि महिलांकडून वापरला जातो. उदाहरण द्यायचे झाल्यास, ‘मै तुम्हारी बजा दूंगा या मेरी बज गई.’ हे वाक्य नेहमीच वापरले जातात. रेड एफएमची टॅगलाइनसुद्धा आहे, ‘बजाते रहो.’ यात कोणताच चुकीचा अर्थ नाही. मल्लिका दुआच्या वडिलांनी जी पोस्ट लिहिली, त्यामध्ये त्यांनी म्हटलं की, मी त्या मूर्ख अक्षय कुमारला धडा शिकवेन. त्यांच्या या वक्तव्याचा अर्थ कसा घ्यायचा? मस्करीत जे शब्द वापरले जातात, त्यांना मस्करी म्हणूनच समजावं. कॉमेडीमध्ये स्वातंत्र्य असावं असं मला वाटतं. एआयबी शोचं मी समर्थनच केलंय आणि आजही मी याच वक्तव्यावर कायम आहे. त्यामुळे मला या वादात टॅग करणं बंद करा.’
वाचा : तुला महिलांचा आदर करता येत नाही; सुनीता राजवारचा नवाजुद्दीनवर पलटवार
ट्विंकलने ट्विटरच्या माध्यमातून जरी अक्षयची बाजू घेतली असली तरी अक्षयने मात्र या संपूर्ण वादावर अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.