मराठीमध्ये अधूनमधून विनोदी चित्रपटांचा ट्रेण्ड कायम आहे. बऱ्याच कालावधीनंतर ‘या टोपीखाली दडलंय काय?’ हा विनोदी आणि राजकीय पाश्र्वभूमीवरचा चित्रपट एक फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे वैशिष्टय़ म्हणजे विनोदवीर अशी ख्याती असलेले ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ आणि आजचा आघाडीचा अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या अभिनयाची जुगलबंदी यात पाहायला मिळणार आहे.
संकलक म्हणून नावाजलेले बुजूर्ग दिग्दर्शक दत्ताराम तावडे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून यापूर्वी त्यांनी केलेले ‘सहकार सम्राट’ आणि ‘खुर्ची सम्राट’ हे राजकीय विषयांवरचे चित्रपट गाजले होते. चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा केल्यानंतर बोलताना अशोक सराफ म्हणाले की, यापूर्वी नाटकातूनही मकरंद अनासपुरेसोबत काम केले होते आणि तेव्हाच्या अनुभवाप्रमाणेच हा चित्रपट करतानाही खूप मजा आली. विनोदी अभिनेत्याला ‘टायमिंग’ची जाण असणे अत्यंत आवश्यक असते. हे ‘टायमिंग’ जाणणारा मकरंद असून त्यामुळेच त्याच्यासोबत काम करताना खूप मजा येते. वैशिष्टय़पूर्ण संवादफेक ही मकरंदची खासियत असून त्याला पाहिल्यावर अभिनेता शंकर घाणेकर यांची आठवण होते कोणताही अभिनिवेश न ठेवता स्वत:शी आणि कलेशी प्रामाणिक असलेला हा कलावंतही आहे, असेही अशोक सराफ यांनी आवर्जून नमूद केले. राजकीय मिश्किली करत विनोदनिर्मिती करणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती उमाकांत आपेट यांनी केली असून कथा-पटकथा-संवादलेखन अरविंद जगताप यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा