झी मराठीवरील ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेला या आठवडय़ात वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. कारण या मालिकेच्या आगामी भागात ‘श्री’चे वडील आणि काका यांचा प्रवेश होणार असून या दोन्ही भूमिकेत अनुक्रमे अभिनेते मनोज जोशी व प्रसाद ओक हे प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत. मालिकेत आजवर प्रसारित झालेल्या भागांमध्ये या दोघांचे फक्त उल्लेख येत होते. प्रत्यक्षात ‘श्री’चे वडील आणि काका हे दोघेही दिसले नव्हते.
आपल्याच मुलांच्या वागणुकीमुळे ‘श्री’ची आजी भागीरथीबाई यांनी त्यांना घराबाहेर काढले आहे. घरातील सर्व बायकांच्या चर्चेत कधी ना कधी या दोघांच्या नावांचा आजवर उल्लेख झाला पण ते कधी दाखविले नव्हते. गेल्या काही दिवसांत मालिकेत साचेबद्धपणा आला असून मालिका काहीशी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे मालिकेला काहीतरी कलाटणी देण्यासाठी ‘श्री’चे बाबा आणि काका ही दोन पात्रे मालिकेत आणण्याचा प्रयोग केला जात आहे. ‘श्री’चे बाबा आणि काका यांना पुन्हा घरातही प्रवेश मिळेल का? भागीरथीबाई आपल्या दोन्ही मुलांना क्षमा करून त्यांना स्वीकारतील का? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.    

Story img Loader