तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी, ‘सनातन धर्म हा समता व सामाजिक न्यायाविरोधात असून या धर्माला संपवून टाकले पाहिजे’, असे विधान केलं. यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. अयोध्येचे संत परमहंस आचार्य यांनी उदयनिधी यांचा शिरच्छेद करण्यासाठी इनामही जाहीर केले होते. आता या विधानाचा फटका शाहरुख खानच्या आगामी ‘जवान’ या चित्रपटाला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उदयनिधी यांच्या वक्तव्याचा शाहरुख खानच्या ‘जवान’शी नेमका कसा संबंध आहे तेच आपण जाणून घेऊयात. शाहरुख खानच्या ‘जवान’चं तामिळनाडूमध्ये वितरण उदयनिधी यांच्या प्रोडक्शन हाऊस ‘रेड जायंट मुव्हिज’ कडून होणार असल्याची बातमी बाहेर आली आणि चाहत्यांनी तातडीने ‘बॉयकॉट जवान’ हा ट्रेंड सुरू केला.

आणखी वाचा : कंगनाने राजकारणात यावं का? मुलाखतीदरम्यान ईशा देओलने दिलं उत्तर; म्हणाली “माझ्या आईने…”

‘रेड जायंट मुव्हिज’ हे सध्या प्रादेशिक चित्रपटांबरोबरच इतर बॉलिवूड चित्रपटांसाठीही वितरक म्हणून काम करत असल्याचं नेटकऱ्यांच्या ध्यानात आलं. संपूर्ण तामिळनाडूमध्ये ‘जवान’चं वितरण उदयनिधी यांचीच कंपनी करणार असल्याचे बरेच दाखले ट्विटरवर बऱ्याच लोकांनी शेअर केले. यामुळेच आता सोशल मीडियावर ‘बॉयकॉट जवान’ ट्रेंड व्हायला सुरुवात झाली आहे.

यामुळे उदयनिधी यांच्यावर टीका होतच आहे याबरोबरच लोकांनी शाहरुख खानवरही निशाण साधायला सुरुवात केली आहे. एका ट्विटर युझरने शाहरुखने तिरूपती मंदिरातील भेटीचा व्हिडीओ शेअर करत त्यावर टीका केली आहे. उदयनिधी यांच्या या वक्तव्यामुळे तामिळनाडूमध्ये शाहरुख खानच्या ‘जवान’च्या कमाईवर फरक पडणार की नाही ते येणारी वेळच ठरवेल. शाहरुख खान, विजय सेतुपती, नयनतारा यांचा ‘जवान’ ७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader