दाक्षिणात्य राज्यांमध्ये रसिक हे त्यांच्या लाडक्या सुपरस्टारच्या चित्रपटावेळी एका एका सणासारखं सेलिब्रेशन करतात. तमिळ सुपरस्टार थलपथी विजय त्याच्या आगामी ‘लिओ’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर लोकप्रिय अभिनेत्री त्रिशा कृष्णन दिसणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला लोकांनी उदंड प्रतिसाद दिला, तसेच हा ट्रेलरही वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने या चित्रपटाची जबरदस्त चर्चा आहे.
भारतात अजून याचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर एक वेगळाच इतिहास रचणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. अशातच आता तमिळनाडूचे युवक कल्याण आणि क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी ‘लिओ’ हा चित्रपट बघून त्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटरवर अवघ्या काही शब्दांत या चित्रपटाचा रिव्यू देताना उदयनिधी स्टॅलिन यांच्याकडून चाहत्यांना स्पॉयलरसुद्धा मिळाला असल्याचं सांगितलं जात आहे.
आणखी वाचा : “माझा चित्रपट नसला तरी…” सलमानच्या ‘टायगर ३’बद्दल दिग्दर्शक कबीर खानचं वक्तव्य चर्चेत
आपल्या या ट्वीटमध्ये उदयनिधी यांनी सुपरस्टार थलपती विजय, दिग्दर्शक लोकेश कनगराज, संगीत दिग्दर्शक अनिरुद्ध रवीचंदर आणि अॅक्शन दिग्दर्शकाचंही कौतुक केलं आहे. या पोस्टमध्ये उदयनिधी यांनी #LCU सुद्धा वापरलं आहे. याचा फूल फॉर्म लोकेश कनगराज युनिव्हर्स असा होतो. हा चित्रपट याच युनिव्हर्सचा भाग असणार असल्याचं उदयनिधी यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये जाहीर केल्याने नेटकऱ्यांनी त्यांना चांगलंच ट्रोल केलं आहे.
सगळीकडेच या चित्रपटाची जबरदस्त हवा आहे. अमेरिकेत आधीच याचे एडवांस बुकिंग सुरू झाले होते. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, चित्रपटाने अमेरिकेत पहिल्या दिवसाच्या बुकिंगमधून अंदाजे ५.८ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचीसुद्धा महत्त्वाची भूमिका आहे. ‘लिओ’ १९ ऑक्टोबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.