शाहिद कपूर, आलिया भट आणि करिना कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बहुचर्चित ‘उडता पंजाब’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. पंजाबमध्ये अमली पदार्थांच्या आहरी गेलेल्या तरूणाईचे वास्तव या चित्रपटातून दाखवण्यात आले आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये शाहिद आणि आलिया हे त्यांच्या आत्तापर्यंतच्या भूमिकांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या अवतारात दिसतात. शाहिदने चित्रपटात टॉमी सिंग या व्यसनाधीन रॉकस्टारची आणि आलिया भटने एका बिहारी मुलीची भूमिका साकारली आहे. ड्रग्जच्या पूर्णपणे आहरी गेलेला शाहिदचा टॉमी सिंग प्रेक्षकांचे निश्चितच लक्ष वेधून घेतो. तर आत्तापर्यंत रोमँटिक आणि ग्लॅमरस भूमिका साकारणाऱ्या आलियाचा या चित्रपटातील अवतार अनेकांना थक्क करणारा आहे. शेतात काम करताना उन्हात रापलेला आलियाचा चेहरा, तिचे बिहारी भाषेतील संवाद प्रेक्षकांसाठी सर्वस्वी नवा अनुभव आहे. याशिवाय, करिना कपूरने साकारलेली डॉ. शिवानी गुप्ताची भूमिकाही प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारी आहे. एकुणच चित्रपटाचा ट्रेलर प्रभावी असून त्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा आणखी ताणली जाणार आहे. अभिषेक चौबे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक असून, १७ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader