संजय लीला भन्साली दिग्दर्शित ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील गाण्यांमुळे निर्माण झालेला वाद शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. ‘पिंगा’ आणि त्यानंतर ‘मल्हारी’ हे गाणी प्रदर्शित झाल्यापासून अनेकांनी चित्रपटास आपला विरोध दर्शविला असताना त्यात पेशवे यांचे वंशज असलेल्या उद्यसिंह यांच्याही विरोधाची भर पडली आहे. उद्यसिंह पेशवे यांनी चित्रपटातून ‘पिंगा’ आणि ‘मल्हारी’ ही गाणी वगळण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.

‘पिंगा’ आणि ‘मल्हारी’ गाणे वगळता येत नसेल तर गाण्यांचे चित्रीकरण तरी बदलण्यात यावे. त्याशिवाय चित्रपट प्रदर्शित करण्यात येऊ नये. तसेच, प्रदर्शनापूर्वी चित्रपट आम्हाला दाखविला जावा, अशीही मागणी उद्यसिंह यांनी केली आहे.

याआधीही पेशवे यांच्या वंशजांकडून चित्रपटावर टीकेची झोड उठली होती. चित्रपटातील गाणी पाहता चित्रपटात तत्कालीन सांस्कृतिक संदर्भ आणि कथेचे विकृत चित्रीकरण करण्यात आले असल्याची टीका प्रसादराव पेशवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात केली होती, तर काशीबाई आणि मस्तानी कधीचं एकत्र नाचल्या नव्हत्या, तसेच या गाण्यांमुळे इतिहासाचे विकृतीकरण झाल्याच्या प्रतिक्रिया लोकांनी दिल्या होत्या.

Story img Loader