‘सिनेमा न्वार’ या प्रकारातला अनुराग कश्यप लिखित-दिग्दर्शित ‘अग्ली’ हा चित्रपट आहे. मनुष्य मूलत: स्वार्थीच असतो, दुसऱ्याच्या भावनांचा ‘वापर’ करण्याची प्रवृत्ती माणसांमध्ये आढळते, अगदी जवळची मित्रमंडळी आणि नात्यांचे राजकारण गडद काळ्या रंगाची असू शकते याचे दर्शन ‘अग्ली’ चित्रपटातून दिग्दर्शकाने केले आहे. रहस्यातून उलगडणारे सत्य प्रेक्षकाला भिडते, खुपते. माणूस हा व्यवस्थेचा त्यापेक्षा परिस्थितीचा बळी असतो असे म्हटले जाते. या म्हणण्याला अनुसरून चित्रपटातील सर्व प्रमुख व्यक्तिरेखांची रचना, त्यांचे स्वभाव दिग्दर्शकाने अधोरेखित केले आहेत. स्वार्थ, पैशाचा हव्यास, चैनीने जगण्याची हौस, प्रसंगी जवळच्या व्यक्तींनाही हातोहात फसविण्याची वृत्ती यावर बोट ठेवण्याचा प्रयत्न चित्रपट करतो.
कली ही शालिनी आणि राहुल यांची छोटी मुलगी. शालिनी आणि राहुलचा घटस्फोट झाला आहे. राहुल हा स्ट्रगल करणारा अभिनेता आहे. शालिनीशी लग्न करून कलीचा जन्म झाला तरी संसारासाठी लागणारे पैसे राहुल कमावू शकत नाही. म्हणून शालिनी कलीला घेऊन वेगळी होती आणि आता शालिनीने शौमिक बोस या पोलीस अधिकाऱ्यासोबत विवाह केला आहे. शालिनीची मुलगी कली तिच्यासोबत राहतेय. आठवडय़ातून एकदाच कलीला भेटण्याची मुभा न्यायालयाने राहुलला दिली आहे. त्याप्रमाणे आठवडय़ातून एक दिवस राहुल आपल्या मुलीला भेटायला येतो. कलीला घेऊन तो त्याच्या गाडीतून तिला फिरायला घेऊन जातो. मध्येच काही महत्त्वाचे काम आहे म्हणून पाच मिनिटांसाठी तो कलीला गाडीत बसवून काम उरकायला जातो. या वेळात कलीचे अपहरण होते. मग अखंड सिनेमा कलीचा शोध घेण्यासाठी राहुल, शालिनी आणि पोलीस अधिकारी असलेला तिचा नवरा शौमिक बोस प्रयत्न करतात.
शौमिक बोस सतत शालिनीचे फोनवरचे संभाषण टॅप करून ऐकत असतो. एकीकडे विचित्र वागणारा नवरा असला तरी शौमिक बोस एक सजग, कर्तव्यवदक्ष पोलीस अधिकारी आहे.
कली ही शौमिक बोसच्या बायकोची मुलगी आहे म्हटल्यावर पोलीस निरीक्षक जाधव आपली यंत्रणा कामाला लावतो. कोणत्याही अपहरणाच्या केसमध्ये सर्वात प्रथम पोलिसांचा संशय घरातल्या व्यक्तींवरच जातो हे आपण टीव्ही मालिका आणि चित्रपटातून पाहिलेले या चित्रपटातही घडते. त्यातून दिग्दर्शकाने मानवी नात्यांमधील जवळच्या नात्यांना गृहित धरून त्याचा ‘वापर’ स्वत:च्या स्वार्थासाठी करण्याची माणसाची प्रवृत्ती अशा अनेक गोष्टी दिग्दर्शकाने प्रकषाने मांडल्या आहेत. राहुलचा मित्र आणि कास्टिंग डायरेक्टर चैतन्य, शालिनीची मैत्रीण आणि राहुलची प्रेयसी राखी मल्होत्रा, शालिनीचा भाऊ सिद्धान्त अशा व्यक्तिरेखांच्या वागण्या-बोलण्यातून, स्वभावातून त्यांचे अंतस्थ हेतू निराळेच काही असल्याचे दिग्दर्शकाने अधोरेखित केले आहे. या सगळ्या व्यक्तिरेखा शक्य तितक्या प्रातिनिधिक करण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे.
तेजस्विनी कोल्हापुरेने सतत मद्यपान करणारी शालिनी उत्तम साकारली आहे. विजय जाधव या पोलीस निरीक्षकाच्या भूमिकेतून गिरीश कुलकर्णी यांनी उत्तम अभिनय केला आहे. रोनित रॉयने साकारलेला पोलीस अधिकारी शौमिक बोस आणि राहुलचा मित्र चैतन्यच्या भूमिकेतील विनीत कुमार सिंग यांनी अभिनयात बाजी मारली आहे. सुरुवातीपासून शेवटापर्यंत प्रेक्षकाला खिळवून ठेवण्यात चित्रपट नक्कीच यशस्वी होतो.
अग्ली
निर्माते – अरूण रंगाचारी, मधू मॅन्टेना, विवेक रंगाचारी, विकास बहल, विक्रमादित्य मोटवाने
लेखक-दिग्दर्शक – अनुराग कश्यप
संगीत – जी. व्ही. प्रकाश कुमार, ब्रायन मॅकोम्बर
छायालेखन – निकॉस अॅण्ड्रित्साकिस
संकलन – आरती बजाज
कलावंत – राहुल भट, रोनित रॉय, गिरीश कुलकर्णी, जयंत गाडेकर, अबीर गोस्वामी, संदेश जाधव, सिद्धान्त कपूर, तेजस्विनी कोल्हापुरे, मुरारी कुमार, अंशिका श्रीवास्तव, माधवी सिंग, विनीत सिंग, सुवरिन चावला व अन्य.