राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या आदेशानंतर रशियानं युक्रेनवर हल्ला केला आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील वाढता तणाव पाहता जग तिसऱ्या महायुद्धात ढकललं जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. युक्रेनमध्ये सध्या युद्ध सुरू असून संपूर्ण जग शांततेसाठी प्रार्थना करत आहे. युक्रेनध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर शिक्षणासाठी गेलेले अनेक भारतीय विद्यार्थी तिथेच अडकून पडले आहेत. यावर अभिनेता सोनू सूदनं चिंता व्यक्त केली आहे. त्याचं ट्वीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
सोनू सूदनं त्याच्या ट्वीटमध्ये लिहिलं, ‘जवळपास १८ हजार भारतीय विद्यार्थी आणि अनेक कुटुंबं सध्या युक्रेनमध्ये अडकलेली आहेत. मी आशा करतो की, त्यांना भारतात परत आणण्यासाठी आपलं सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे. मी भारतीय दूतावासाला तिथे अडकलेल्या लोकांना देशात परत आणण्यासाठी पर्यायी मार्ग शोधण्याचं आवाहन करत आहे. त्या सर्वांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करतो.’ त्याचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
दरम्यान युक्रेन आणि रशियामध्ये असलेल्या सर्व भारतीयांना भारतात आणण्यासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. सरकारने गांभीर्याने घेतले असून तेथील भारतीय लोकांना आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहे. गृहमंत्री राजनाथ सिह यांच्याशी बोलणं झाले आहे. या देशांमध्ये अडकलेल्यांपैकी विदर्भातल्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. सध्या विमान पाठवू शकत नाही पण योग्य वेळी प्रयत्न करून त्यांना परत आणण्यात येईल, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे.
आणखी वाचा- युक्रेनमधील सध्याच्या युद्धभूमीवर झालंय ‘RRR’च्या हिट गाण्याचं शूटिंग, व्हिडीओ व्हायरल
याशिवाय युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त आहे, या पार्श्वभूमीर महाराष्ट्र सरकार देखील केंद्र सरकार व परराष्ट्र विभागाच्या सातत्याने संपर्कात आहे. अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री व काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.