बिग बॉसच्या १५ व्या पर्वात नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत राहिलेला उमर रियाज नुकताच बिग बॉस हाऊसमधून बाहेर पडला. पण त्याआधी बिग बॉसच्या घरात काही पॅनलिस्टनी हजेरी लावली होती. यावेळी पॅनलिस्ट म्हणून आलेल्या गीता कपूरनं उमर रियाजला बरंच सुनावलं होतं. एवढंच नाही तर त्याच्या प्रोफेशनवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्यावर आता बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर उमर रियाजनं ट्वीट करत गीता कपूरला सडेतोड उत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘विकेंड का वार’मध्ये पॅनलिस्ट म्हणून आलेल्या गीता कपूरनं उमर रियाजला म्हटलं होतं, ‘उमर रियाज तू सर्जन आहे. पण ज्या प्रकारे तू या शोमध्ये सर्वांच्या समोर आलास ते पाहता माझी जर कधी तब्येत बिघडली तर तुझ्यासारख्या डॉक्टरकडे उपचार घ्यायला येणार नाही. असं वाटतं की तुझ्यात खूप राग भरलेला आहे. या घरातून बाहेर पडल्यावर जेव्हा तू पुन्हा डॉक्टर म्हणून काम करशील तेव्हा एखाद्यानं तुझ्याकडे उपचार करून घ्यायला कसं काय यावं.’

गीता कपूरच्या या विधानावर आपल्या ट्वीटच्या माध्यमातून उमरनं उत्तर दिलं आहे. त्याने लिहिलं, ‘गीता मॅम मी तुम्हाला माझा स्वभाव सांगतो, जेव्हा संपूर्ण भारत देशात करोनाचा प्रसार वेगानं होत होता. तेव्हा मी माझ्या आरोग्याचा किंवा स्वतःचा विचार न करता माझ्या देशाची आणि माझ्या देशातील जनतेची सेवा केली. मी पूर्ण- पूर्ण दिवस काम केलं. कारण स्वतःचा विचार न करता इतरांची सेवा करण्याचे संस्कार मला मिळाले आहेत.’


उमर रियाजनं आणखी एका ट्वीटमध्ये लिहिलं, ‘मी माझ्या देशाची सेवा केली पण तुम्ही एका रिअलिटी शोमध्ये येऊन माझ्या प्रोफेशनला माझ्या स्वभावाशी जोडलं. मी त्याचवेळी व्यक्त झालो जेव्हा माझ्याबद्दल बोललं गेलं. जे तुम्ही कधीच समजू शकत नाही. हे खूपच दुःखद आहे की, तुम्ही एक उदाहरण प्रस्थापित करण्यासाठी मला नॅशनल टेलिव्हिजनवर मला बदनाम करण्याचा प्रयत्न केलात.’

दरम्यान उमर रियाजच्या चाहत्यांनी मात्र गीताच्या वक्तव्यानंतर उमरलाच पाठींबा दिला आहे. गीता कपूरनं बोलता बोलता आपल्या मर्यादा पार केल्या असल्याचं अनेक युजर्सनी म्हटलं आहे. उमर रियाजचं अशाप्रकारे एलिमिनेट होणं सर्वांसाठीच धक्कादायक होतं. कारण तो विजेतेपदाच्या शर्यतीत प्रबळ दावेदार मानला जात होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Umar riaz tweet goes viral he answer back geeta kapoor for commenting on his profession mrj