‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ मालिकेतील अॅडव्होकेट ओम चौधरीच्या भूमिकेतील उमेश कामत छोटय़ा पडद्यावर चांगलाच भाव खाऊन गेला. त्याआधीही ‘शुभंकरोति’ मालिकेत तो निषादच्या म्हणजेच प्रेमिकाच्या भूमिकेत दिसला होता. उमेशची ‘रोमँटिक हिरो’ची प्रतिमा जास्त लोकप्रिय असल्याने असेल ‘एका लग्नाची..’नंतरही तो अशाच काहीशा भूमिकांमध्ये दिसेल किंवा मग तो आणि प्रिया पुन्हा ‘टाईमप्लीज’सारखा रोमँटिक चित्रपट करतील, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात, उमेशने त्यानंतर ‘बाळकडू’ आणि ‘पेईंग घोस्ट’ असे दोन वेगळे चित्रपट केले आणि आता आगामी तिसऱ्या चित्रपटात तो चक्क एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे.
प्रत्येक कलाकाराला आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका कराव्यात असे साहजिकपणे वाटत असते. पण, म्हणून मी जाणीवपूर्वक आधी ‘बाळकडू’सारखा चित्रपट के ला, मग ‘पेईंग घोस्ट’सारखा विनोदी चित्रपट केला असे अजिबात नाही. उलट, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ या मालिकेनंतर मी तीन चित्रपटांच्या ऑफर्स स्वीकारल्या होत्या. त्यातले हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आणि आता तिसऱ्या चित्रपटात मी गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे, असे उमेशने ‘वृत्तान’शी बोलताना सांगितले. पण, मालिका असो वा चित्रपट, उमेशने आजपर्यंत रोमँटिक नायकाच्या भूमिका जास्त साकारल्या आहेत, हे तोही मान्य करतो.
मला रोमँटिक कथा खूप आवडतात. त्यामुळे मला त्या प्रकारच्या भूमिका करायला मनापासून आवडतात. मात्र, कलाकार म्हणून मी अमुक एका प्रकारच्या भूमिकांमध्ये अडकू शकत नाही, हेही तितकेच खरे आहे, असे तो म्हणतो. सध्या ‘पेईंग घोस्ट’ या चित्रपटाच्या निमित्ताने तो विविध देशांच्या वारीवर आहे. ‘पेईंग घोस्ट’ प्रदर्शित झाला तेव्हाच आम्हाला यूके, यूएसएमधून चित्रपटाच्या शोजकरता विचारणा झाली होती. मग ऑस्ट्रेलिया, जर्मनी, स्वित्र्झलड अशी ही यादी वाढत गेल्याचे उमेशने सांगितले. पहिल्यांदाच मराठी चित्रपटासाठी म्हणून एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर परदेशात भटकंती करतो आहोत. म्हणजे, एरव्ही मराठी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांनी परदेशात मागणीनुसार त्यांचे शोज होतात. मात्र, ‘पेईंग घोस्ट’ इथे प्रदर्शित झाला तेव्हाच परदेशातही त्याचे शोज झाले आहेत. परदेशात राहणाऱ्या मराठी लोकांकडून जे प्रेम मिळते आहे, जो प्रतिसाद मिळतो आहे तोही एक आनंद देऊन जाणारा आहे, असे उमेशने सांगितले. मराठी चित्रपट तिथल्या लोकांना पाहायला मिळतात, पण कलाकारांना भेटण्याची संधी फार कमी वेळा मिळते. ‘पेईंग घोस्ट’च्या निमित्ताने भेटलेल्या तिथल्या लोकांनी आवर्जून या विषयी सांगितले, असे उमेश म्हणतो.
उमेश कामत आणि प्रिया बापट या दोघांनीही आत्तापर्यंत वेगवेगळ्या दिग्दर्शकांबरोबर काम केले आहे. या बाबतीत बोलताना, प्रियाने आत्तापर्यंत महेश मांजरेकर, रवि जाधव, सचिन कुंडलकर यांच्याबरोबर काम केले आहे. तिच्याबद्दल मला नेहमीच कौतुक वाटते. आमच्या गप्पांमध्ये नेहमी हा विषय निघतो तेव्हा ती मला तिच्या दिग्दर्शकांविषयी सांगत असते. त्याचवेळी मी अतुल काळे असेल किंवा सुश्रुत असेल अशा नव्या दिग्दर्शकांच्या कामाच्या पद्धतीविषयी तिला सांगतो. पण, एकाच व्यवसायात असल्यामुळे आमच्या दोघांमध्ये होणारी विचारांची देवाणघेवाणही तितकीच रंजक असते, असे उमेशने सांगितले.
उमेश कामत ‘गँगस्टर’च्या भूमिकेत
‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ मालिकेतील अॅडव्होकेट ओम चौधरीच्या भूमिकेतील उमेश कामत छोटय़ा पडद्यावर चांगलाच भाव खाऊन गेला.
First published on: 30-06-2015 at 06:54 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Umesh kamat in gangster role