रेश्मा राईकवार
मातीच्या कुशीतला ओलावा सगळय़ांच्याच वाटय़ाला येतो असं नाही. कधीकधी माळरानी खडकातही मिळालेला उबदारपणा एखादं बीज अंकुरण्यासाठी पुरेसा असतो. ती ऊब कशी, कुठे मिळेल हे असं काही ठरीव आपल्यालाही सांगता येणं शक्य नाही. एकमेकांवरच्या विश्वासातून, प्रेमातून, मैत्रीतून, मायेतून असे किती तरी अंकुरले बीज आपले आपण अंधार बाजूला सारून सूर्यप्रकाशाच्या दिशेनं जायचा प्रयत्न करतात. हा सगळाच कोवळा अलवार अनुभव शब्दांत पकडणं कठीण. कोवळय़ा मनांची स्पंदनं टिपत त्याचं घडणं, बिघडणं आणि पुन्हा घडत राहण्यातली गंमत तितक्याच तरल, भावगर्भ मांडणीतून उलगडणारा आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘उनाड’ हा चित्रपट त्यांच्या आजवरच्या चित्रपटांपेक्षा सर्वार्थाने वेगळा चित्रपट आहे.
नितळ, निखळ मनोरंजनाबरोबरच खूप काही देऊ पाहणारा दृश्य, संवाद, अभिनय, पार्श्वसंगीत या सगळय़ांचा अप्रतिम वापर करत जे दाखवतो आहे त्यापलीकडचं समजून घेण्याची प्रगल्भता मनात निर्माण करणारा ‘उनाड’ हा अंमळ वेगळाच अनुभव आहे. ‘जिओ सिनेमा’ या ओटीटी वाहिनीवर प्रदर्शित झालेला हा चित्रपट खरं तर चित्रपटगृहात जाऊन मोठय़ा पडद्यावरच अनुभवायला हवा इतका सुंदर आहे. सध्या तरी हा चित्रपट ओटीटीवरच पाहावा लागणार आहे. कोकणात कोळीवाडय़ातल्या तीन जिवलग मित्रांची ही गोष्ट. बंडय़ा, शुभम आणि जमील.. सामान्य घरातून आलेली तिन्ही मुलं, महाविद्यालयीन काळात मिसरूड फुटत असताना मनात जागणाऱ्या अनेक संवेदना, जमेल तितका अभ्यास करायचा प्रयत्न आणि नदीच्या पाण्यात सूर मारून डुंबणं-भटकणं अशा कैक उनाड गोष्टींमध्ये रमलेली, मुरलेली त्यांची मैत्री आहे. तिघांच्याही घरची परिस्थिती बेताची; पण वेगवेगळी, तिघांचेही स्वभाव वेगवेगळे आणि तरीही एकमेकांना समजून घेणारे. बंडय़ाचे चैतूबरोबर जुळू पाहणारे सूर, जमीलवर वडिलांच्या अपेक्षांचं ओझं आणि या सगळय़ात कुठलीच बंधनं नसलेला, न मानणारा शुभम यांच्यात पुण्याहून कोकणात आलेल्या मोकळय़ाढाकळय़ा स्वराचा प्रवेश होतो. शुभम आणि स्वरामधलं उमलत जाणारं नातं, ते फुलण्याआधीच त्याचा वेगळा अर्थ घेण्याच्या प्रयत्नात शुभमकडून दुखावली गेलेली स्वरा, रागावर नियंत्रण नसलेल्या शुभमकडून नकळतपणे घडलेली एक चूक अशा एकामागोमाग एक घटना घडत जातात. यातून तिघंही सैरभैर होतात. काही काळ त्यांचं तारू भरकटतं, स्वत:चाच नव्याने शोध घ्यायला लावतं.
आंजर्ले, हर्णे परिसरांत या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आलं आहे. कोकणातली गावं, कोळीवाडे, गल्ल्या, घराच्या पागोळय़ांवरून उतरणारे पावसाचे थेंब, निळा अथांग समुद्र, त्यात हेलकावणाऱ्या होडय़ा, दोन्ही बाजूंनी असलेल्या हिरव्यागार झाडीतून जाणाऱ्या वाटा.. प्रत्येक दृश्य, त्या दृश्याच्या चौकटीतली प्रत्येक गोष्ट बोलकी झाली आहे. कथेत पात्रांच्या तोंडी जितका संवाद आहे, त्यापेक्षाही त्यांच्या आजूबाजूचा भवताल आपल्याशी अधिक बोलत राहतो. छायाचित्रणकार लॉरेन्स डीकुन्हा यांनी प्रत्येक दृश्य बोलकं केलं आहे. एकेक फ्रेम बघताना आपण हरखून जातो. चित्रपटाची पटकथा दिग्दर्शक आदित्य सरपोतदार आणि सौरभ भावे यांची आहे. बदलत्या वयातल्या या तरुण मनांची घालमेल समजून घ्यायची आहे किंवा त्यांच्यात घडणाऱ्या प्रसंगातून तुम्हाला काही खूप मोठं सांगायचं आहे असा कुठलाच अभिनिवेश या चित्रपटात नाही. या तिघांची गोष्ट पडद्यावर पाहताना आपण त्यात गुंततो, हरवतो, प्रत्येक फ्रेम आपण अनुभवतो. इतक्या साध्या पण अतिशय सुंदर पद्धतीने आदित्य सरपोतदार यांनी हा चित्रपट बांधला आहे. कथा-पटकथा, कॅमेरा, पार्श्वसंगीत, गाणी या सगळय़ात एक ताजेपणा आहे. एक अजब सुसूत्रता आहे. जी शांतता या चित्रपटाच्या फ्रेममध्ये आहे तीच शांतता, हळुवारपणा गाण्यांमध्ये आहे. क्षितिज पटवर्धन आणि गुरू ठाकूर यांची गाणी आणि गुलराज सिंग यांचं अप्रतिम तरुणाईला भावेल असं संगीत हे समीकरण खूप छान जुळून आलं आहे. प्रत्येक प्रसंगाचा सूर त्या त्या गाण्यातूनही तुमच्यापर्यंत पोहोचतो, फ्रेममधून पोहोचतो. त्याला तितक्याच नव्या चेहऱ्याच्या, दमाच्या कलाकारांनी साथ दिली आहे. शुभमची भूमिका साकारणारा आशुतोष गायकवाड, अभिषेक भरते, जमीलच्या भूमिकेतील चिन्मय जाधव या तिघांबरोबरच स्वराच्या भूमिकेतील हेमल इंगळे हिनेही खूप सहज शैलीत अभिनय केला आहे. देविका दफ्तरदार, संदेश जाधव, देवेंद्र पेम या अनुभवी कलाकारांचीही उत्तम साथ त्यांना मिळाली आहे. बोलीभाषेचा हेल काही ठिकाणी खटकतो. काही ठिकाणी प्रसंगांमधली संगती लक्षात येत नाही. संकलनाच्या नादात दोन प्रसंग जोडून घेताना काही तरी राहून गेलं आहे हे जाणवतं. अर्थात चित्रपटाची लांबी कमी ठेवण्यासाठी हा खटाटोप असावा. मात्र या काही गोष्टींमुळे चित्रपटाचा प्रभाव कुठेही कमी होत नाही. भवतालीचा उनाड वारा, पक्ष्याचं गाणं, नदीचा संथ प्रवाह, भर उन्हातली रखरख, मनातलं गाणं अशा कैक गोष्टी चित्रपट पाहताना तुम्हाला ऐकू येतात, जाणवतात. या सगळय़ाच्या मदतीने रंगत जाणारी ही ‘उनाड’ गोष्ट एक वेगळी अनुभूती आहे.
उनाड
दिग्दर्शक – आदित्य सरपोतदार
कलाकार – आशुतोष गायकवाड, अभिषेक भरते, चिन्मय जाधव, हेमल इंगळे, अविनाश खेडेकर, देविका दफ्तरदार, संदेश जाधव, देवेंद्र पेम.