नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत असल्याचे दिसत आहे. ‘झुंड’ या चित्रपटाची अनेक चित्रपट समीक्षक तसेच कलाकार कौतुक करताना दिसत आहे. नुकतंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी झुंड या चित्रपटाचे कौतुक केले आहे.
नितीन गडकरींनी काही दिवसांपूर्वी कार्यक्रमानिमित्त नागपुरात भेट दिली. यावेळी त्यांनी त्यांच्या व्यस्त कामातून वेळ काढत नागराज मंजुळेंचा झुंड हा चित्रपट पाहिला. हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत प्रतिक्रिया दिली. यावेळी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचं तोंडभरुन कौतुक केले.
“नागराज मंजुळे हे उत्कृष्ट दिग्दर्शक आहेत. त्यांनी सैराट सारखा चांगला चित्रपट केला आहे. त्यांना मी वेगळं प्रशस्तिपत्र देण्याची काही गरज नाही. याआधी सिनेसृष्टीने त्यांना त्यांच्या कार्याचे प्रमाणपत्र दिले आहे. झुंड ही अत्यंत सुंदर कलाकृती आहे. लोकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी छोट्या कलाकारांना मोठी संधी दिली आहे. आता हे कलाकार चांगलं नाव कमावतील”, असे नितीन गडकरी म्हणाले.
दरम्यान अभिनेता जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव, सुबोध भावे यांच्यासह अनेक दिग्गज अभिनेत्यांनी ‘झुंड’ चित्रपटाबद्दल विविध पोस्ट शेअर करत त्याचे कौतुक केले आहे. ‘झुंड’ या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसात ६.५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर १.५० कोटींची कमाई केली होती. त्यानंतर शनिवारी २. १० कोटी आणि रविवारी २.९० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसात या चित्रपटाने जवळपास ७ कोटींची कमाई केली आहे.
‘झुंड’वरुन होणाऱ्या टीकांवर नागराज मंजुळेंनी दिले स्पष्टीकरण, म्हणाले “जर तक्रार असेल तर…”
‘झुंड’ हा चित्रपट स्लमसॉकरचे संस्थापक विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले आहे. ‘झुंड’ हा चित्रपट ४ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात अमिताभ बच्चन हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु यांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.