‘दुनियादारी’ने काहीशा अपेक्षित आणि अनपेक्षितपणे एव्हाना अकरा-बाराव्या आठवड्यापर्यन्त तीस कोटी रुपयाच्या कमाईपर्यन्त झेप घेतली (असे प्रचारकी बातम्या सांगतात) आणि कादंबरीवर बेतलेले चित्रपट कसे यशस्वी ठरतात याची चर्चा रंगली.
मराठीतील विपुल साहित्यावर दर्जेदार चित्रपट निर्माण होवू शकतात अशा अपेक्षांना त्यामुळे पुष्ठी मिळाली, तसेच ‘माध्यमांतर’ या विषयाकडे गांभिर्याने कसे पाहाता येते याचाही शोध घेतला गेला. पण अशा वेळी साहित्यावर बेतलेल्या दोन मराठी चित्रपटाना रसिकानी पूर्णपणे नाकारले याचाही विसर पडू देता कामा नये, असे वाटते.
रत्नाकर मतकरी यानी ‘इन्व्हेस्टमेंट’ या आपल्या कथासंग्रहावर बेतलेल्या त्याच नावाच्या चित्रपटाची पूर्वप्रसिध्दी चांगली होती, बरेच काही छान-चांगले प्रसिध्दही करुन आणले गेले. पण त्याचा गर्दी खेचण्यात फारसा फायदाच झाला नाही.
तर राजन खान यांच्या ‘सत ना गत’ या कांदंबरीवर दिग्दर्शक राजू पासकर याने त्या नावाचा चित्रपट काढला. सध्या समाजात स्त्रीयांवरील आत्याचाराच्या घटना वाढत असताना या चित्रपटाला चर्चेसाठी फायदा होईल असे वाटले. पण चित्रपटाचा पूर्व-प्रसिध्दीपासूनच घोळ-गोंधळ झाला, नंतर चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्याला अपेक्षित प्रतिसादच मिळाला नाही.
या अपयशापासून काही जाणून घेता येईल, शिकता देखिल येईल. पण प्रसार माध्यमे त्याबाबत फारशी गंभीर नाहीत असे जाणवते. मराठी चित्रपट रसिक सुज्ञ आहे, त्याला विश्लेषण आवडते. तो आगामी चित्रपटांच्या गोडधोड पूर्वप्रसिध्दीवर भाळत नाही हो.

Story img Loader