भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मॉडेल उर्फी जावेदला लक्ष्य केल्यानंतर सध्या दोन्ही बाजूंनी टीका केली जात आहे. चित्रा वाघ उर्फीच्या कपड्यांवरून तिच्यावर सातत्याने टीका करत आहेत. तसंच त्याबद्दलचं पत्रही त्यांनी मुंबई पोलिसांना दिलं आहे. यानंतर उर्फी जावेदही चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर देत आहे. दोघींमध्ये गेल्या तीन दिवसांपासून चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. अशातच ‘मला भेटली तर उर्फी जावेदला थोबडवून काढेन’, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत, त्यानंतर उर्फीने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली असून चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
“मला भेटली तर थोबडवून काढेन…” उर्फी जावेदच्या वक्तव्यानंतर चित्रा वाघ पुन्हा आक्रमक
उर्फी जावेदने दिल्लीतील कंझावाला अपघातातील तरुणीचा व्हिडीओ स्टोरीला शेअर केला असून त्यावरून चित्रा वाघ यांना टोला लगावला आहे. दिल्ली अपघाताबद्दल संताप व्यक्त करत उर्फी जावेदने लिहिलं आहे की “पोलीस एक अपघात म्हणून या प्रकरणाचा तपास करत होते. ते (आरोपी) तिला १२ किलोमीटरपर्यंत फरफटत घेऊन गेले, तिची हाडं मोडली होती, तिच्या अंगावर कपडे नव्हते. चित्रा वाघ या घटनेतील एक आरोपी तुमच्याच पक्षाशी संबंधित आहे. मला तुम्हाला इथे आवाज उठवताना बघायला आवडेल,” असं उर्फी जावेदने म्हटलं आहे.
Open Letter: चित्राताई वाघ, उर्फीवर कारवाई करण्यास एवढा उशिराचा मुहूर्त का?
दिल्लीत नेमकं काय घडलं?
दिल्लीत एका कारने दुचाकीस्वार तरुणीला धडक दिल्यानंतर तिचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे अपघातानंतर आरोपींनी कार न थांबवता तरुणीला सुलतानपूरी ते कंझावालापर्यंत फरफटत नेलं. तब्बल १२ किमीपर्यंत आरोपी तरुणीला फरफटत होते. पोलिसांना रस्त्यावर नग्न अवस्थेत तिचा मृतदेह सापडला.
या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पाच आरोपींना सोमवारी अटक करण्यात आली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.