मॉडेल उर्फी जावेद तिच्या अतरंगी फॅशन व कपड्यांमुळे चर्चेत असते. तिचे कपडे सातत्याने चर्चेचा विषय ठरतात. तिने आतापर्यंत अगदी दगडांपासून, पोत्यापासून ते सेफ्टी पिनांपासून बनवलेले कपडे घातले आहेत. पण या विचित्र फॅशनमुळे फक्त लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली, काम मिळालं नाही, अशी खंत उर्फीने व्यक्त केली आहे.
उर्फी म्हणाली, “मला लोकप्रियता मिळाली आहे का? मी प्रसिद्धी मिळवली आहे का? या प्रश्नांचं उत्तर होय आहे. पण मला काम मिळालं का? तर त्याचं उत्तर नाही आहे. लोक माझा आदर करत नाहीत. त्यांना माझ्यासोबत काम करायचं नाही.” विचित्र, अतरंगी कपडे घालण्याचं कारणही तिने सांगितलं. “मला लोकांचं लक्ष वेधून घ्यायला आवडतं, म्हणूनच मी असे कपडे घालते,” असं उर्फी म्हणाली.
सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगबद्दलही उर्फीने भाष्य केलं. “मी पण माणूस आहे. मला पण वाईट वाटतं. मूड खराब होतो. पण ते फक्त ५-१० मिनिटांसाठी असतं. त्यानंतर मी स्वतःला सांगते की कदाचित मी खूप चांगली आहे आणि ट्रोलिंग करणारे लोक खूप वाईट आहेत,” असं ती म्हणाली.
दरम्यान, यापूर्वी एका मुलाखतीत उर्फीने तिच्यावर होणारी टीका व ट्रोलिंगवर मत व्यक्त केलं होतं. ‘मी वाईट असेनही कदाचित, पण या गोष्टी मी सोडू शकत नाही, कारण त्या इंटरनेटवर कायम राहतील’, असं ती म्हणाली होती.