पंकज भोसले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चित्रपटातील पत्रकार पाहणे हे बऱ्याचदा गमतीशीर प्रकरण असते. मधल्या काही वर्षांमध्ये बॉलीवूडमधील कित्येक चित्रपटांमध्ये पुढारलेल्या विचारांची नायिका दाखवायची झाल्यास चित्रकर्ते ती व्यक्तिरेखा हमखास पत्रकार बनवत असल्याचे लक्षात येईल.(आठवा डिंपल कपाडियापासून प्रीती झिंटा,अनुष्का शर्मापर्यंत कुठल्याही पत्रकार नायिकेचा आवेश) बाकी त्या नायिकेचे बातमी लिहिण्याचे वा मांडण्याचे कसब यातील तपशील गुंडाळून थेट देशभरात खळबळोत्तम वृत्त देऊन ती यशस्वी पत्रकारांच्या पंगतीत बसलेली पाहायला मिळणारे टाळीफेक कथानक रंगलेले दिसेल. देशी सिनेमांमध्ये नायक पत्रकाराच्या भूमिकेत असल्यास झुंजार-निडर आणि जांभेकरी वंशाची साऱ्या लक्षणांनी नटलेला अष्टांगांहून अधिक पैलूसमृद्ध सुपरमॅन समोर येतो. (वानगीदाखल पाहावा ‘फिर भी दिल है हिंदूस्थानी’) सारे राजकीय घोटाळे आणि भानगडी त्यालाच पहिल्या समजतात. साऱ्या देशाचे त्याच्या पत्रकारितेवर लक्ष लागून असते आणि दहशतवाद्यांपासून कोणत्याही आंतरराष्ट्रीय संकटापासून राष्ट्राला वाचविण्याची अतिशयोक्त ताकद त्याच्याच अंगात असते. हॉलीवूडच्या तद्दन व्यावसायिक चित्रपटांतील नायकांमध्येही या पत्रकार प्रजातीचे अवशेष सापडत असले, तरीही पत्रकारांना गांभीर्याने मांडणारे चित्रपट तुलनेने अधिक आहेत.

वृत्तपत्रकारांवर आलेल्या इंग्रजी चित्रपटांचे साधारण तीन प्रकार दिसतात. त्यातला पहिला एखाद्या काल्पनिक वा वास्तवातील ऐतिहासिक घटनेला गंभीरपणे उभी करून दाखविणारा (सिटीझन केन, ऑल द प्रेसिडण्ट्स मेन, स्पॉटलाइट्स), दुसरा पत्रकारितेतील घटकांना घेऊन अतिशयोक्तीपूर्ण रंजक कहाणी रचणारा (अँकरमन, ब्रूस ऑलमाईटी) आणि तिसरा पत्रकारितेतील सूक्ष्म तपशिलांना सोबत घेऊन उत्तम भावनाटय़ पडद्यावर घडविणारा. या चित्रप्रकारात गेल्या काही वर्षांत फार उत्तम चित्रपटांचा भरणा झाला आहे. संगीत पत्रकाराला पूर्वाश्रमीच्या संगीतकार प्रियकराचा छडा लावण्यास प्रवृत्त करायला लावणारे कथानक असलेला ‘लकी देम’, टाइम मशीनद्वारे फिरण्यास सोबत हवी असल्याची विचित्र जाहिरात देणाऱ्या व्यक्तीचा माग काढत त्यावर शोधलेख तयार करण्याची उठाठेव दाखवणारा ‘सेफ्टी नॉट गॅरेण्टेड’ आणि कादंबऱ्यांमुळे प्रसिद्धीच्या परमोच्च शिखरावर असताना आत्महत्या करणाऱ्या डेव्हिड फॉस्टर वॉलेस याचे रांगडे व्यक्तिचित्र रोलिंग स्टोनच्या पत्रकाराशी झालेल्या मुलाखतींमधून मांडणारा ‘द एण्ड ऑफ द टूर’ या सिनेमांमधील गंभीर पत्रकार अधिकाधिक वास्तवातले वाटतात. नोरा एफ्रॉनकृत रोमॅण्टिक कॉमेडीजमधील पत्रकार उगाच छाछूगिरी करताना दिसत नाहीत, कारण निश्चित अशा लेखनधारणांचा पुरस्कार या लेखिकेने आयुष्यभर केला. उत्तम बातमी लिहिण्याचे (कॉपी) कसब, उत्तम जगण्याची कला कसे शिकविते, यावर एफ्रॉन यांनी आपल्या लेखनातून वेळोवेळी प्रकाशझोत टाकला. गॉन गर्लने गाजलेल्या गिलियन फ्लिन या लेखिकेच्या ‘शार्प ऑब्जेक्ट्स’ कादंबरीत तर (अन् त्यावर झालेल्या टीव्ही मालिकेमध्येही) पत्रकार असलेल्या व्यक्तिरेखेचा बातमी या मूलभूत घटकाशी असलेला संबंध अतिशय बारकाव्यानिशी रंगविण्यात आला आहे. नेमका हाच दृष्टिकोन काही महिन्यांपूर्वी आलेल्या ‘अप देअर’ या अल्पखर्चात तयार झालेल्या उत्तम सिनेमामध्ये दिसून येतो. लेखन दिग्दर्शनासह अभिनयापर्यंत सर्व भूमिकांत सक्रिय असलेल्या मायकेल ब्लाउस्टीन, डॅनियल वाईनगार्टन आणि झोई कॅण्टर्स यांनी तयार केलेल्या या चित्रपटातील पत्रकार कोणतेही जांभेकरी लक्षण नसतानाही चित्रपटाची कथा छानपैकी रंगवितो.

कधी कधी मोठा नामवंत कलाकारांचा ताफा, प्रचंड पैसा खर्चाची खुमखुमी, तांत्रिक बाजू सांभाळणाऱ्या सर्वोत्तम चमूची सज्जता असली तरी साजेशा कल्पकतेअभावी चित्रपट फोल ठरतो. तर कधी या साऱ्या गोष्टींच्या अभावावर सर्वार्थाने मात करू शकणारी कल्पना असेल, तर अर्थातच तिचे परिणाम चांगली निर्मिती होण्यात दिसतात. ‘अप देअर’ हे त्याचेच उदाहरण.

हा चित्रपट अमेरिकेतील कित्येक पिढय़ा काम करीत असलेल्या खाणीच्या छोटय़ा गावात घडतो. या खाणींमधील लोह खनिज संपल्यामुळे त्या बंद होतात. त्यानंतर तेथल्या लोकांनी सकारात्मकदृष्टय़ा आपल्या रोजगारात केलेले बदल आणि त्यांच्या जगण्याचा आलेख मांडणारा रिपोर्ताज लिहिण्यासाठी जॅक (डॅनियल वाईनगार्टन) हा न्यू यॉर्क टाइम्सचा पत्रकार काही दिवसांसाठी गावात दाखल होतो. त्याच्या आणि त्याच्या संपादकाच्या दृष्टीने मांडण्यास फार कठीण नसलेल्या वृत्तलेखाचा विषय त्याच्याकडे आलेला असतो. पाच-पन्नास लोकांवर उलट-सुलट प्रश्नांचा भडिमार करून वेगवेगळ्या अंगांनी गावाच्या बदलत्या मानसिकतेचा आढावा घेऊन नियोजित लेख मांडायचा, ही त्याची अटकळ असते. मात्र शांत आणि टुमदार खेडय़ामधली एकही व्यक्ती पत्रकार म्हटल्यावर जॅकला माहिती देण्यासाठी समोर उभे देखील करीत नाही आणि वृत्तशोधाचा एक संपूर्ण दिवस वाया जातो. गावातील नागरिकांच्या बुद्धय़ांकाला शिव्या देत असताना त्याची ओळख  फारच गळेपडू आणि काहीशी वेडसर वाटणाऱ्या एमा (झोई कॅण्टर्स) या तरुणीशी होते. ती त्याला माहिती गोळा करण्यासाठी मदत करण्यास तयार होते. मात्र त्या बदल्यात ‘उत्तम कसे लिहावे’ याचे धडे आपल्याला द्यावेत असा आग्रह जॅकपुढे धरते. कोणताही पर्याय नसल्यामुळे जॅक तयार होतो. प्रत्येक घरात जॅकला नेऊन एमा गावातील लोकांना माहिती देण्यासाठी बोलते करते. जॅकच्या वृत्तलेखाचे काम सोपे व्हायला लागते. आता एमाला लेखनाचे धडे देण्याची वेळ येते, तेव्हा तिच्या विचित्र वागणुकीतील तपशिलांचा माग घेण्याचा प्रयत्न जॅक करू लागतो. गावात काही वर्षांपूर्वी झालेल्या बेछूट गोळीबाराचे शिकार ठरलेल्या पालक आणि आप्तांच्या बळीमुळे एमाच्या मनावर झालेल्या आघातामुळे ती पूर्णपणे विस्कटली असल्याचा शोध त्याला लागतो. मानसिक धक्क्य़ातून पूर्ववत न झालेल्या या मुलीलाच वृत्तलेखाचा विषय करण्याचा निर्धार तो करतो. आपली ही वृत्तडोळसता तात्काळ आपल्या विक्षिप्त संपादकाला कळवतो. एमाला दुर्घटनेविषयी बोलते आणि लिहिते करताना गोष्टी सरळ राहात नाहीत, अन् आपल्या कारकिर्दीला झळाळी मिळण्यासाठी जॅक तयार करीत असलेला सर्वात महत्त्वाचा रिपोर्ताज बनणे अवघड व्हायला लागते.

अभिनय, संवाद आणि चित्रभाषेच्या दृष्टीने ‘अप देअर’ने अत्यंत कमी बजेटमध्ये मोठी मजल मारलेली दिसते. सहलेखक आणि मुख्य अभिनेत्री असलेल्या झोई कॅण्टर्सने एमाच्या अवघड व्यक्तिरेखेला सुंदररीत्या उभे केले आहे. पत्रकारिता आणि लेखन हा इथल्या कथेचा गाभा असला, तरी त्यापलीकडे गावातील वातावरणातले भावस्पर्शी मनोरंजन म्हणूनही या चित्रपटाचे अवलोकन महत्त्वाचे आहे.