‘रेड’, ‘हिचकी’, ‘बागी २’ यांसारख्या चित्रपटांची मार्च महिन्यात चर्चा पाहायला मिळाली. विशेष म्हणजे महिन्याच्या अखेरीस प्रदर्शित झालेल्या ‘बागी २’ने कमाईच्या बाबतीत चांगलीच बाजी मारली. आता एप्रिल महिन्यात कोणकोणते उल्लेखनीय मराठी आणि हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत, त्यांचा आढावा घेऊयात..
हिंदी चित्रपट-
ब्लॅकमेल (६ एप्रिल २०१८)-
इरफान खान आणि किर्ती कुल्हारी यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘ब्लॅकमेल’ हा चित्रपट ६ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘डेली बेली’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनय देव याचं दिग्दर्शन करत आहेत. नावाप्रमाणेच जबरदस्त सस्पेन्स, संभ्रमात पाडणारी कथा आणि नेहमीप्रमाणे इरफानचं तगडं अभिनय हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य ठरणार आहे.
ऑक्टोबर (१३ एप्रिल २०१८)-
आतापर्यंत न पाहिलेली अनोखी अव्यक्त प्रेमकहाणी ‘ऑक्टोबर’ या चित्रपटाच्या माधम्यातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वरूण धवन आणि बनिता संधू यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट १३ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. सुजित सरकार दिग्दर्शित ‘ऑक्टोबर’मधून बनिता बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
मर्क्युरी (१३ एप्रिल २०१८)-
कोरिओग्राफर, अभिनेता आणि दिग्दर्शक- निर्माता असा हरहुन्नरी प्रभूदेवाचा ‘मर्क्युरी’ हा चित्रपट १३ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. या थरारपटात प्रभूदेवाचा अनोखा अंदाज आणि एक वेगळी कथा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
बियॉण्ड द क्लाऊड्स (२० एप्रिल २०१८)-
दिग्दर्शक माजिद मजिदी यांच्या ‘बियॉण्ड द क्लाऊड्स’ या चित्रपटातून अभिनेता इशान खत्तर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात इशानने धोबी घाटमध्ये राहणाऱ्या एका मुलाची (आमिर) व्यक्तिरेखा साकारत आहे. तर इशानच्या मोठ्या बहिणीची (तारा) भूमिका मल्याळम अभिनेत्री मालविका मोहनन साकारत आहे. चित्रपट महोत्सवांमध्ये दाद मिळालेला ‘बियॉण्ड द क्लाऊड्स’ २० एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.
ओमर्ता (२० एप्रिल २०१८)-
पाकिस्तानी वंशाचा ब्रिटीश दहशतवादी अहमद ओमर सईद शेखच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. यामध्ये राजकुमार या दहशतवाद्याची मुख्य भूमिका साकारत आहे. हंसल मेहता दिग्दर्शित ‘ओमर्ता’ हा चित्रपट २० एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्स’मधून पदवी घेतलेला ओमर दहशतवादी कसा होतो, हे या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. प्रदर्शनापूर्वीच विविध चित्रपट महोत्सवात या चित्रपटाने वाहवा मिळवली आहे.
नानू की जानू (२० एप्रिल २०१८)-
अभय देओल आणि पत्रलेखा यांच्या मुख्य भूमिका असलेला विनोदी भयपट ‘नानू की जानू’ २० एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.
हाय जॅक (२० एप्रिल २०१८)-
आणखी एक चित्रपट २० एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे, तो म्हणजे ‘हाय जॅक’. आकर्ष खुराना दिग्दर्शित या चित्रपटात सुमित व्यास, मंत्रा, सोनाली सैगल, कुमुद मिश्रा यांच्याशी भूमिका आहेत. मराठीतील लोकप्रिय जोडी अमेय वाघ आणि निपुण धर्माधिकारी यामध्ये पाहुण्या कलाकराच्या भूमिकेत पाहायला मिळतील.
मराठी चित्रपट-
असेही एकदा व्हावे (६ एप्रिल २०१८)-
माणसाच्या जीवनात येणाऱ्या विविध नात्यांच्या गुंतागुंतीतून त्याचे आयुष्य ठरत असते. प्रत्येक नात्यातील कंगोरे आणि जबाबदारी पेलताना ‘असेही एकदा व्हावे’ या आशेवर प्रत्येक व्यक्ती मार्गक्रमण करत असतो. नात्याच्या याच आशावादी पैलूंवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात उमेश कामत आणि तेजश्री प्रधान यांच्या मुख्य भूमिका असून ६ एप्रिल रोजी तो प्रदर्शित होत आहे.
मंत्र (१३ एप्रिल २०१८)-
एका पुरोहिताचा मुलगा पैशासाठी वडिलांचा पेशा स्वीकारतो पण जेव्हा त्याच्या आयुष्यात कर्मकांडाला न मानणारी मुलगी येते तेव्हा ‘मंत्र’ची कथा घडते. लेखक, दिग्दर्शक हर्षवर्धन यांनी ‘मंत्र’च्या माध्यमातून आजच्या तरुणाईचा आध्यात्मिक विषयावरचा गोंधळ मांडला आहे. मनोज जोशी यांची भूमिका असलेला हा चित्रपट १३ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
शिकारी (२० एप्रिल २०१८)-
विविध विषयांवर भाष्य करत साचेबद्ध कथानकांना शह देत मराठी सिनेमातही काही प्रशंसनीय प्रयोग करण्यात येत आहेत. याच प्रयोगांचं एक उदाहरण म्हणजे आगाम सिनेमा ‘शिकारी’. महेश मांजरेकर यांचे सादरीकरण असणाऱ्या या सिनेमाचे दिग्दर्शक विजू माने आहेत. या चित्रपटातून विनोदी कथानक पाहायला मिळणार, हा चित्रपट अडल्ट कॉमेडी असणार की, एक गंभीर सामाजिक नाट्य असणार याबद्दलच मराठी चित्रपट रसिकांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे.