हिंदी चित्रपटसृष्टीचे बॉलीवूड असे नामकरण झाल्यापासून तसेच एकपडदा चित्रपटगृहांची संख्या घटून मल्टिप्लेक्स संस्कृतीचा उदय झाल्यानंतरच्या काळात असंख्य नवोदित तरुण नट-नटय़ांनी बॉलीवूडचा रुपेरी पडदा काबीज केला. तीन खानांचा करिश्मा अजूनही कायम असला तरी आशय-विषयदृष्टय़ा नवीन हिंदी चित्रपट आणि नवनवीन कलावंतांच्या प्रवेशामुळे मधल्या फळीतील म्हणता येतील असे कलावंत रुपेरी पडद्यावरून गेल्या वर्षी अदृश्य झाले होते. अशाच काही तात्पुरत्या गायब झालेल्या कलावंतांचे चित्रपट या वर्षांत प्रदर्शित होत आहेत. त्यामध्ये रेखा, रणबीर कपूर, मल्लिका शेरावत, जॉन अब्राहम, ऐश्वर्या राय-बच्चन यांचे नाव घेता येईल.
कतरिना कैफसोबतच्या ‘अफेअर’मुळे सातत्याने गेले वर्षभर चर्चेत राहिला असला तरी रणबीर कपूरचा एकही चित्रपट २०१४मध्ये प्रदर्शित झालेला नाही. ‘बेशरम’ या २०१३ साली येऊन गेलेल्या चित्रपटानंतर थेट यावर्षी रणबीर कपूरचे अनेक महत्त्वाकांक्षी चित्रपट प्रदर्शित होतील. त्यामध्ये बहुचर्चित ‘बॉम्बे वेलवेट’ हा अनुराग कश्यप दिग्दर्शित चित्रपट असून त्याबरोबरच अनुराग बासू दिग्दर्शित आणि प्रेयसी कतरिना कैफसोबतचा ‘जग्गा जासूस’, दीपिका पदुकोणसोबतचा इम्तियाज अली दिग्दर्शित ‘तमाशा’ असे काही चित्रपट झळकणार आहेत. यावर्षी रणबीर कपूर ‘जग्गा जासूस’मार्फत निर्माता म्हणूनही पदार्पण करतोय.
सौंदर्यवती ऐश्वर्या राय-बच्चन २०१० साली आलेल्या ‘गुजारिश’नंतर रुपेरी पडद्यापासून दूर राहिली. संजय गुप्ता दिग्दर्शन करणार असलेल्या ‘जजबा’ या चित्रपटाचे चित्रीकरण तिने सुरू केले असून हा कोरियन चित्रपटाचा रिमेक असेल. हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता असून करण जोहर आणि रणबीर कपूर यांच्यासोबतचा ‘ऐ दिल है मुश्किल’ हा तिचा चित्रपटही यावर्षी चित्रित केला जाणार आहे.
अभिनेत्री रेखा एका ताकदवान भूमिकेद्वारे यावर्षी ‘फितूर’ या चित्रपटातून झळकणार आहे. चार्ल्स डिकन्स यांच्या ‘ग्रेट एक्स्पेक्टेशन्स’ या कादंबरीवर आधारित हा चित्रपट असून यात मिस हविशाम ही भूमिका रेखा साकारत आहे. २०१० साली ‘सदियाँ’ या चित्रपटानंतर रेखा रुपेरी पडद्यावर झळकली नव्हती. २०१३ मध्ये जॉन अब्राहमचा ‘मद्रास कॅफे’ प्रदर्शित झाला होता. त्यानंतर जॉनही रुपेरी पडद्यावर दिसला नाही. एका वर्षांच्या कालावधीनंतर यावर्षी जॉन अब्राहमचा ‘वेलकम बॅक’, ‘ढिशूम’, ‘रॉकी हॅण्डसम’, ‘हेराफेरी ३’ असे चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
एकेकाळची ‘हॉट’ बिनधास्त अभिनेत्री मल्लिका शेरावत २०१२ नंतर एकदम तीन वर्षांनी आता प्रेक्षकांसमोर येतेय. हॉलीवूड चित्रपट करण्याचा प्रयत्न फसल्यानंतर आता मल्लिका शेरावत पुन्हा बॉलीवूडकडे वळली असून के. सी. बोकाडिया दिग्दर्शित ‘डर्टी पॉलिटिक्स’ या चित्रपटातून झळकणार आहे. हा चित्रपट भंवरी देवी यांच्या वास्तव जीवनावर आधारित असल्याचे समजते. यातील प्रमुख भूमिका मल्लिका शेरावत साकारत असली तरी चित्रपटाच्या प्रोमोमधून तिचे आयटम साँगच अधिक दाखविण्यात येत असून त्यामुळे प्रमुख भूमिका तिचीच आहे किंवा नाही याबाबत चर्चा रंगली आहे.
रुपेरी पडद्यावरून अदृश्य झालेल्या तारे-तारकांचे या वर्षांत दर्शन
हिंदी चित्रपटसृष्टीचे बॉलीवूड असे नामकरण झाल्यापासून तसेच एकपडदा चित्रपटगृहांची संख्या घटून मल्टिप्लेक्स संस्कृतीचा उदय झाल्यानंतरच्या काळात असंख्य नवोदित तरुण नट-नटय़ांनी बॉलीवूडचा रुपेरी पडदा काबीज केला.
First published on: 10-02-2015 at 07:24 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upcoming bollywood movies