मराठी रंगभूमीवरील मोहन तोंडवळकर, मोहन वाघ, मच्छिंद्र कांबळी, प्रभाकर पणशीकर, विनय आपटे, सुधीर भट असे एकापेक्षा एक तालेवार निर्माते एकापाठोपाठ काळाच्या पडद्याआड जात असताना एक प्रश्न राहून राहून मनात येत असे : यापुढे मराठी रंगभूमीचं काय होणार? कारण हे केवळ व्यावसायिक नाटय़निर्माते नव्हते, तर नाटकाच्या ध्यासात ते २४ तास बुडालेले होते. ही मंडळी सक्रीय असेतो नव्या निर्मात्यांना रंगभूमीवर शिरकाव करणं मुश्कीलच होतं. बरं, हे निर्माते निव्वळ धंदेवाईक नाटकं काढत नसत, तर प्रसंगी खिशाला खार लावून समकालीन सामाजिक आशय-विषयावरची अर्थपूर्ण नाटकं काढण्याची धमकही त्यांच्यात होती. मोहन तोंडवळकरांसारखा निर्माता तर एखादं नाटक फारसं चालणार नाही, तरीही रंगभूमीच्या प्रगतीसाठी ते करणं गरजेचं आहे असं वाटलं तर नफा-नुकसानीचा विचार न करता बेधडक त्याची निर्मिती करत. त्या निर्मितीत हात पोळून निघाले तरी त्याचं त्यांना काही वाटत नसे. मराठी रंगभूमी ही देशातील अग्रगण्य रंगभूमी होण्यात अशा निर्मात्यांचे मोठे योगदान आहे. मात्र, या तालेवार निर्मात्यांच्या अस्तानंतर रंगभूमीवर अनेक नवे निर्माते अवतरले असले तरी नाटकाची ‘पॅशन’ त्यांच्यात नाही. या निर्मात्यांचा डोळा गल्लापेटीवरच असतो. धंद्याचं नाटक असेल तरच ते त्याला हात घालू इच्छितात. सध्या नाटकाचे बरेच व्यवस्थापक फायनान्सर्सच्या जोरावर निर्माते बनले आहेत. पण त्यांची नजर धंद्यावरच असते. आशयघन, अर्थगर्भ नाटय़निर्मितीशी त्यांना देणंघेणं नाही. याला अपवाद : दिनू पेडणेकर आणि राहुल भंडारे. पैकी दिनू पेडणेकर यांना घरातूनच नाटकधंद्याचा वारसा मिळालेला. परंतु राहुल भंडारे मात्र अशी कोणतीही पाश्र्वभूमी नसताना रंगभूमीवर निर्माते म्हणून अवतरले.
कॉलेजजीवनात एकांकिकांच्या निमित्ताने नाटकाचा कीडा त्यांच्या अंगी भिनलेला होता. परंतु कॉलेजमध्ये नाटकं करणारे सगळेजण लेखक, दिग्दर्शक अथवा अधिककरून नट-नटीच होऊ इच्छितात. निर्मितीत कुणालाही रस नसतो. कारण त्यात कसलंच ग्लॅमर नाही. आपला चेहरा लोकाना दिसण्याची सुतराम शक्यता नाही. त्याहून नाटकधंद्यात जी मोठी आर्थिक रिस्क असते, ती घेण्याची कुणाची तयारी नसते. असं असताना ‘मानवाधिकार’ या विषयात कायद्याचा अभ्यास करणाऱ्या राहुल भंडारे यांनी नाटकधंद्यात निर्माता म्हणून उतरायचा निर्णय घेतला, हेच मोठं आश्चर्याचं होतं. नाटकधंद्याची ओ की ठो माहिती नाही. निर्मिती कशाशी खातात, याचं काडीमात्र ज्ञान नाही. तरीही दुर्दम्य आशावाद या एकाच भांडवलावर त्यांनी ‘अद्वैत थिएटर्स’ची स्थापना केली. लेखक-दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव, अभिनेता सिद्धार्थ जाधव यांना साथीला घेऊन त्यांनी ‘जागो मोहन प्यारे’ या आपल्या पहिल्यावहिल्या नाटकाची निर्मिती केली. दहा वर्षांपूर्वीची ही घटना. ४ ऑक्टोबर २००६ साली त्यांनी ‘अद्वैत’चं रोपटं लावलं आणि २४ एप्रिल २००६ रोजी ‘जागो’चा पहिला प्रयोग गडकरी रंगायतनला सादर झाला. शुभारंभाच्या प्रयोगाची अनाऊन्समेंट सुरू होणार, तोच कुणीतरी रंगमंचामागच्या काळोखात उद्गारलं, ‘ही कालची पोरं आता नाटक करणार?’ पहिलीच नाटय़निर्मिती करणाऱ्या राहुल भंडारे यांच्या कानात हे नाउमेद करणारे शब्द तापल्या सळीसारखे घुसले, परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं.
..आणि प्रयोग रंगतदारपणे सादर झाला. प्रेक्षकांनी तो डोक्यावर घेतला. प्रियदर्शन जाधव, सिद्धार्थ जाधव आणि राहुल भंडारे या तरुण, अननुभवी त्रिकुटानं अंधारातल्या त्या वटवाघळाचे बोल खोटे पाडले होते. ‘जागो’ने पुढे तब्बल ६०० प्रयोगांचं घवघवीत यश आपल्या तुऱ्यात खोवलं. त्यानंतर ‘अद्वैत’नं फिरून मागे वळून पाहिलंच नाही. प्रियदर्शन जाधवचं ‘प्यार किया तो डरना क्या?’ हे आगरी-कोळी बोलीतलं नाटक ही ‘अद्वैत’ची दुसरी निर्मिती. प्रेक्षक, समीक्षक आणि पुरस्कारांची रोख पोचपावती मिळवणाऱ्या या नाटकानं राहुल भंडारे निर्माते म्हणून नाटय़व्यवसायात स्थिरावण्याची प्रक्रिया सुरू झाली.
राहुल भंडारेंचा हा हुन्नर महेश मांजरेकरांसारख्या नाटक-सिनेमा क्षेत्रात काळ्याचे पांढरे झालेल्या कलावंताच्या नजरेस न पडता तरच नवल. त्यांनी राहुल भंडारेंना सोबत घेऊन संयुक्त नाटय़निर्मितीचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला. एव्हाना मोठी झेप घेण्याची आस लागलेल्या राहुल भंडारेंना नवे अवकाश खुणावत होते. त्यांनी ही संधी दवडली नाही. ‘मी शारूक मांजरसुंभेकर’ या नाटकाच्या निर्मितीत मांजरेकर-भंडारे जोडी जमली. नाटकाला ‘लार्जर दॅन लाइफ’ स्केल देण्याचं मांजरेकरांचं कसब यानिमित्ताने भंडारे यांच्या प्रत्ययाला आलं. केवळ निर्माता म्हणूनच नव्हे, तर व्यक्ती म्हणून डबक्यातून सागरात उडी घेण्याची हिंमत आणि त्यासाठीची मानसिकता त्यांना या सोबतीतून मिळाली. ग्लॅमर, पुरस्कार, प्रसिद्धीचा झगमगाट आणि पैसा या सगळ्याशी त्यांची हळूहळू जानपहचान होऊ लागली.
यशाची चव माणसाला त्याच त्या चक्रात अडकवते असं म्हणतात. परंतु राहुल भंडारे यांनी या चक्रात अडकायचं साफ नाकारलं. आशय, विषय, सादरीकरण यांत वैविध्य असलेल्या ‘ऑल द बेस्ट- द म्युझिकल’, ‘टॉम आणि जेरी’, ‘करून गेलो गाव’ अशा भिन्न प्रकृतीच्या नाटकांची निर्मिती त्यांनी जाणीवपूर्वक केली. या साऱ्या वाटचालीत महेश मांजरेकर, प्रियदर्शन जाधव, सिद्धार्थ जाधव यांची आपल्याला मोलाची साथ लाभली याबद्दलची कृतज्ञता आजही ते बाळगून आहेत.
नंतर आलं- ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ हे मराठी रंगभूमीचा चेहरामोहरा बदलणारं नाटक. राहुल भंडारे या नाटकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यापूर्वी नऊ निर्मात्यांनी ते नाकारलं होतं. व्यावसायिक नाटक म्हणजे काय, हे माहीत नसलेल्या जालना जिल्ह्य़ातील जांबसमर्थ या खेडय़ातील शेतकरी कलावंतांनी सादर केलेलं हे नाटक प्रत्यक्ष रंगमंचावर येण्यापूर्वीच वादग्रस्त ठरलं. कशीबशी त्यातून त्याची सुटका झाली आणि ते रंगभूमीवर अवतरलं. आणि धो-धो धावू लागलं. काही ठिकाणी त्याला प्रचंड विरोधही झाला; परंतु त्यावर मात करत नाटकानं सुसाट मुसंडी मारली.. प्रयोगसंख्या, पुरस्कार आणि मानमान्यतेतही!
‘अद्वैत’ने यानंतर संजय पवारांचं ‘ठष्ट’ अर्थात् ‘ठरलेलं लग्न मोडलेल्या मुलींची गोष्ट’ हे एका महत्त्वाच्या सामाजिक समस्येला वाचा फोडणारं नाटक सादर केलं. या नाटकानं तर इतिहासच घडवला. व्यावसायिक राज्य नाटय़स्पर्धेत सवरेत्कृष्ट नाटकासह अनेक पुरस्कारांवर त्याने आपली मोहोर उमटवली. ‘एकदा पाहावं न करून’ या लिव्ह इन् रिलेशनशिपवरील नाटकाला मात्र अपेक्षित यश लाभलं नाही. परंतु त्यानंतरच्या मोहन जोशींना घेऊन केलेल्या ‘गाढवाचं लग्न’ या वगनाटय़ाने ‘अद्वैत’ची पुन्हा एकदा यशाशी सोयरीक केली.
व्यावसायिक रंगभूमीवर निर्माता म्हणून स्थिरावत असतानाही राहुल भंडारे आपली सामाजिक बांधिलकी विसरले नव्हते. पथनाटय़े, प्रायोगिक नाटकं हीसुद्धा रंगभूमीची निकड आहे हे ते जाणून होते. म्हणूनच संभाजी भगत यांच्या ‘अडगळ’ या प्रायोगिक नाटकाला त्यांनी साहाय्य केलं. आणि पुढे ‘बॉम्बे- १७’ या नावानं ते व्यावसायिक रंगमंचावर सादर करण्याचं धाडसही केलं. हेही नाटक वादग्रस्त ठरलं. ‘रंगभूमीचं पावित्र्य या नाटकानं बाटवलं!’ असा कंठशोष काही संस्कृतिरक्षकांनी केला. धारावीच्या झोपडपट्टीतल्या माणसांचं जगणं रंगभूमीवर मांडणाऱ्या या नाटकाला त्यांनी अस्पृश्य ठरवलं. परंतु एव्हाना वादाची वादळं अंगावर घ्यायची सवय झालेल्या राहुल भंडारे त्यांना पुरून उरले. गमतीची गोष्ट म्हणजे संस्कृतिरक्षकांकडून अस्पृश्य ठरविल्या गेलेल्या या नाटकाची नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या भारत रंगमहोत्सवात सादरीकरणासाठी निवड झाली!
लवकरच ‘स्टॅच्यु ऑफ लिबर्टी’ हे अरविंद जगताप व संभाजी भगत लिखित आणि राजेश देशपांडे दिग्दर्शित वेगळ्याच विषयावरचं पंधरावं नवं नाटक घेऊन ‘अद्वैत’ येत आहे.
एकीकडे धंद्याची नाटकं करत असतानाच रंगभूमीला पुढे घेऊन जाणारी अर्थपूर्ण नाटकं धाडसानं करणारा निर्माता म्हणून राहुल भंडारे यांच्याकडे आज आशेनं पाहिलं जात आहे. जुन्या मातब्बर निर्मात्यांची पॅशन त्यांच्यापाशी आहेच; त्याचबरोबर रंगभूमीच्या उत्थानाची कळकळही! ‘अद्वैत’च्या दशकी वाटचालीत रसिकांच्या मनात हा विश्वास निर्माण करणाऱ्या निर्माते राहुल भंडारे यांच्या यापुढच्या प्रवासावर रसिकांचं दक्ष लक्ष असणार आहेच.