मराठीतील प्रसिद्ध जोडी अभिनेता वैभव तत्त्ववादी आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. पण यावेळी त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती आहे. ती म्हणजे अभिनेत्री नेहा जोशी. एक प्रसन्न, टवटवीत आणि खुसखुशीत लव्हस्टोरी आगामी ‘रेडीमिक्स’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेम करणाऱ्या प्रत्येकालाच फेब्रुवारी महिन्याचे विशेष आकर्षण असते. ही भुरळ घालण्यासाठी यावर्षी खास ‘रेडीमिक्स’ फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे ८ तारखेला प्रदर्शित होत आहे.

जालिंदर कुंभार दिग्दर्शित ‘रेडीमिक्स’मध्ये समीर चिटणीस या उमद्या तरुण इंटिरियर डेकोरेटरच्या आयुष्यात वेगळं काही करू पाहणारी नुपूर ही सुंदर तरुणी येते आणि त्यानंतर त्याचे आयुष्य वेगळेच वळण घेते. वैभव तत्ववादी आणि प्रार्थना बेहेरे आणि हरहुन्नरी अभिनेत्री नेहा जोशी यांच्या अफलातून अभिनयाचं रसायन नक्कीच प्रफुल्लीत करणारं आहे. त्यांच्या जोडीला अभिनेते सुनिल तावडे, आनंद इंगळे, नेहा शितोळे, गिरीश परदेसी, आशा पाटील, रमा नाडगौडा, अश्विनी कुलकर्णी, उदय नेने, राजू बावडेकर, आशिष गोखले इत्यादी सहकलाकार आहेत.

वाचा : Video : राजामौलींच्या घरात सनई-चौघडे; प्रभास-अनुष्काचा व्हिडिओ व्हायरल

चित्रपटात एकूण चार गाणी असून ती गुरु ठाकूर, अश्विनी शेंडे, अभय इनामदार यांनी शब्दबद्ध केली आहेत. त्यावर लोकप्रिय संगीतकार अविनाश–विश्वजित यांनी संगीतसाज चढवला असून हे संगीत प्रेक्षकांवर गारुड घालण्यासाठी सज्ज आहे. आजची लोकप्रिय युवा गायिका आर्या आंबेकर, मुग्धा कऱ्हाडे, शिखा जैन, गायक आशिष शर्मा, फराद भिवंडीवाला, विश्वजित जोशी यांनी स्वरसाज चढवीत माधुर्य वाढविले आहे.

‘येरे येरे पैसा’ या सुपरहिट चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या अमेय विनोद खोपकर यांच्या ‘एव्हीके फिल्म्स’ने ‘रेडीमिक्स’ची प्रस्तुती केली आहे. ‘सावित्रीच्या लेकी’ या वेगळ्या चित्रपटाद्वारे जालिंदर कुंभार यांनी रुपेरी पडद्यावर आपली छाप सोडली होती. त्यानंतर मात्र ते छोट्या पडद्यावर सक्रीय होत ‘आयुष्यमान भव:’, ‘कालाय: तस्मैनम:’, ‘मधु इथे आणि चंद्र तिथे’, ‘लज्जा’, ‘अनामिका’, ‘अनुबंध’ ‘का रे दुरावा’, अशा लोकप्रिय मालिकांच्या लेखन दिग्दर्शनात आपलं वेगळं स्थान सिद्ध केलं. आता पुन्हा रुपेरी पडद्याकडे वळत ‘रेडीमिक्स’ असा रोमकॉम चित्रपट घेऊन येत आहेत.

Story img Loader